पालकमंत्र्यांच्या नादी लागाल तर शहरातही दिसणार नाही – गुलाबराव पाटलांनी दिला इशारा : प्रभाग 20 मध्ये विकासकामांचे लोकार्पण :


भुसावळ : भुसावळातील काही प्रवृत्ती अशा आहेत ज्या मुख्याधिकार्‍यांनाही त्रास देत आहेत. कुणी स्वतःला डाकू समजत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही, एवढेच नव्हे तर आमच्या नादी त्यांनी लागू नये, त्यांचे सर्व रेकॉर्ड खिशात आहे , नादी लागाल तर त्याचा अंदाज बांधू शकत नाही. अजूनपर्यंत पालकमंत्री काय आहे ते दाखवलेले नाही व ज्या दिवशी दाखवेल त्या दिवशी हे लोक शहरातही दिसणार नाहीत, अशी जोरदार खोचक टिका कुणाचेही नाव न घेता गुलाबराव पाटील यांनी येथे केली.
रविवार, 15 रोजी नगरसेवक महेन्द्रसिंग ( पिंटू ठाकूर ) यांच्या प्रभागात विविध विकासकामांचे लोकार्पण ना. गुलाबराव पाटिल यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.


प्रसंगी व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जि.प.चे माजी सदस्य विश्‍वनाथ पाटील, नगरसेवक युवराज लोणारी, प्रमोद नेमाडे, महेंद्रसिंग ठाकूर, अ‍ॅड.बोधराज चौधरी, प्रा.सुनील नेवे, किरण कोलते, अमोल इंगळे, उद्योजक मनोज बियाणी, गिरीश महाजन, पुरूषोत्तम नारखेडे, सतीश सपकाळे, देवा वाणी, शोभा नेमाडे, राजीव पारीख, संतोष बारसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, भुसावळ शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून 18 वर्षांच्या मुलाच्या हातात कट्टा आला आहे. ही बाब गंभीर आहे या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मी चर्चा करणार आहे . शहरातील गुन्हेगारी अजिबात खपवून घेतली जाणार नाही, या संदर्भात पोलीस उपअधीक्षकांसोबत सुद्धा गुन्हेगारांना हद्दपार करण्याबाबत मी चर्चा केली असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगीतले . आमदार संजय सावकारे यांचा कुणालाही त्रास नाही, त्यांचे काम कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगत कौतुक केले.