जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता – संत मुक्ताबाई पालखी सोहळा आज मुक्ताईनगरात परतणार


मुक्ताईनगर – पंढरीच्या राया प्रभु दिनानाथा !
आज्ञा द्यावी आता येतो आम्ही!!
राई रखुमाई सत्यभामा माता!
आज्ञा द्यावी आता येतो आम्ही !!
भावविभोर अंतःकरणाने वारकर्‍यांनी भगवान श्री विठ्ठलाचा निरोप घेत पुढची वारी पायीच होवू दे, कोरोनाच संकट घालव अशी आर्त विनवणी केली. श्री विठ्ठल, राई रखुमाई, सत्यभामा,गरुड हनुमंत आदी सर्वाची आज्ञा घेत परतवारीकरीता मुक्ताईनगरकडे दुपारी दोन वाजता प्रस्थान ठेवले. रविवारी सकाळी 9 वाजता नवीन मुक्ताबाई मंदीर येथे पालखी सोहळा आगमन होईल.

पालखी सोहळा मुक्ताईनगरात उद्या पोहोचणार
तत्पूर्वी पहाटे काकड आरती लवकर आटोपून गोपाळपूर येथे काल्यासाठी मुक्ताबाई दिंडी सोहळा दाखल झाला. तेथे गोपाळपूर सरपंच विलास मस्के, गोपालकृष्ण मंदीर अध्यक्ष दिलीप गुरव, पंढरपूर तहसीलदार सुशिलकुमार बल्व्हे यांनी स्वागत केले. ह .भ.प.रवींद्र महाराज हरणे यांचे काल्याचे कीर्तन झाले. संचारबंदी असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात केला होता . मानाची पालखी दिंडी शिवाय भाविकांना प्रवेशबंदी होती.तदनंतर परीक्रमा करून पालखी विठ्ठल रूक्मिणी मंदीरात आली असता समितीचे अध्यक्ष गहीणीनाथ महाराज औसेकर, विश्वस्त ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, अड् माधवी निगडे, प्रशासकिय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी श्री संत मुक्ताबाई पादुकांचे पूजन केले. मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील,विणेकरी रतिराम महाराज शास्त्री, रविंद्र महाराज हरणे, पंजाबराव पाटील, शंकरराव पाटील, निळकंठराव पाटील यांचा सन्मान केला.त्यानंतर मुक्ताबाई व विठ्ठल रूक्मिणी भेट सोहळा झाला वारी सोबत आलेल्या सर्व वारकरी ,कर्मचारी यांनी शांततेत विठ्ठल दर्शन घेतले. दुपारी मूक्ताई मठात परतवारीचे अभंगांचे भजनात सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पालखी पूजन आरती केली. सोपानकाका पालखी सोहळ्याचे ह.भ.फ.त्रिगुणमहाराज गोसावी यांचे हस्ते पादुका बसमध्ये आसनस्थ करुन परतवारी प्रवास सुरू झाला. चंद्रभागा तीरावर आरती पसायदान करून वारीचा समारोप झाला. जालना येथे संध्याकाळी मुक्काम करून रविवारी सकाळी 9 वाजता पालखी सोहळा मुक्ताईनगर येथे नविन मंदीरात पोहोचेल.

कृतकृत्य झालो ईच्छा केली ते पावलो
बर्‍याच दिवसांपासून आईसाहेब सोहळ्यासोबत पायी वारी करण्याची इच्छा होती . सद्गुरू दिगंबर महाराज चिनावलकर यांच्या दिंडी परंपरेची जबाबदारी असल्याने वेळेचे नियोजन जमत नव्हते. अखेर कोरोनामुळे आईसाहेब मुक्ताबाई सोबत बसने का होईना वारीचा योग आला. अनंत जन्माची पुण्याई फळाला आली. मनातील हाकेला आईने साद दिली. कृतकृत्य झालो ईच्छा केली ते पावलो, असे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे म्हणाले.