शिरपूर : शेत जमीन लाभ क्षेत्रात येत नसल्याबाबत ना हरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात एक हजारांची लाच लागणार्या शिरपूर पाटबंधारे उपविभागातील कालवा निरीक्षक तुषार दिलीप दलाल (40, रा.प्लॉट क्र.19 पित्रेश्वर कॉलनी, शिरपूर) यास धुळे एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच सोमवारी अटक केली. या कारवाईने पाटबंधारे विभागातील कर्मचार्यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली. 35 वर्षीय तक्रारदार यांची मौजे पिंपळे, ता.शिरपूर येथील शेत जमीन लाभ क्षेत्रात येत नसल्याबाबतचा ना हरकत दाखला धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून तयार करून देण्याच्या मोबदल्यात आरोपी तथा कालवा निरीक्षक तुषार दलाल यांनी सोमवारी लाच मागितली होती. या संदर्भात तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. आरोपीने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली.

हा सापळा धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, जयंत साळवे, शरद काटके, कैलास जोहरे, राजन कदम, पुरुषोत्तम सोनवणे, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, भूषण शेटे,संदीप कदम, महेश मोरे, संतोष पावरा, सुधीर मोरे, गायत्री पाटील आदींच्या पथकाने यशस्वी केला.


