फैजपूर : वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना केलेली नजरकैद तसेच समस्त वारकर्यांवर केलेल्या अत्याचार, भागवत धर्माचा पताका यांचा अवमान, कोरोनाच्या नावाखाली केलेला घोर अपमानाच्या निषेधार्थ विश्व हिंदू परीषद बजरंग दल तसेच संत महंत भाविकांच्या उपस्थित फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवार भजन कीर्तन करून राज्य शासनाच्या कृतीचा निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. विश्व हिंदू परीषद बजरंग दल, संत-महंत, मान्यवरांच्या हस्ते प्रांताधिकारी कार्यालयात निषेध व मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाचा स्वीकार प्रांत कार्यालयातील रशीद तडवी यांनी केला.
वारकरी संप्रदायाच्या केलेल्या या घोर अपमानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वारकर्यांची तत्काळ माफी मागावी या सर्व प्रकारची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी शासकीय पूजेचा मान घेऊ नये, राज्य सरकारने वारकर्यांच्या मागण्यांचा निश्चित निर्णय न घेतल्यास येत्या काळात महाराष्ट्रव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा यापूर्वीच देण्यात आला असून या आंदोलनानंतर ही साधुसंतांची अवहेलना न थांबल्यास महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या 60 टक्के असलेला वारकरी समाज संपूर्ण महाराष्ट्रात पंढरपूर पॅटर्न राबवण्यासाठी येणार्या काळात रस्त्यावर उतरेल, असा गंभीर इशारा निवेदनात देण्यात आला.

याप्रसंगी प्रास्ताविक हभप नरेंद्र नारखेडे यांनी केले. महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज, विश्व हिंदू परीषद जिल्हा मंत्री योगेश भंगाळे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महामंडलेश्वर श्री पुरुषोत्तम दासजी महाराज, शास्त्री भक्ती किशोरदास महाराज, सुरेश शास्त्री मानेकर महाराज, हभप दुर्गादास महाराज, धनराज महाराज, पुंडलिक महाराज, जि.प.चे माजी सदस्य भरत महाजन, भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहेते, सरचिटणीस संजय सराफ, अॅड.कालिदास ठाकूर, बजरंग दल जिल्हा संयोजक प्रतीक वारके, शहराध्यक्ष लोकेश कोल्हे, डॉ.भरत महाजन, डॉ.चंद्रशेखर पाटील, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, युवराज किरंगे, भाजपा तालुका उपाध्यक्ष नितीन नेमाडे, पिंटू तेली, रीतेश चौधरी, राजेश चौधरी, रामा होले, धनराज कोळी यासह संत महंत भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


