भुसावळ –
भुसावळ नगरपालिकेची शुक्रवार १६ जुलै रोजी विविध कामांसाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये एकूण ३१७ विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. या ३१७ विषयांमध्ये विरोधी नगरसेवकांच्या प्रभागातील एकाही समस्येचा समावेश नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली असून मुख्याधिकारी यांचेकडे प्रभागातील समस्यांबाबत वारंवार तक्रारी केल्या असून देखील मुख्याधिकाऱ्यांचे सत्ताधारी व ठेकेदार यांचेशी संगनमत असल्याने ते विरोधकांच्या प्रभागातील कामांकडे हेतुपुरस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नगरसेवकांनी आज बुधवार दिनांक 14 जुलै रोजी येथील शासकीय विश्राम गृह येथे दुपारी 12 वाजताआयोजित पत्रकार परिषदेत केला मुख्याधिकारी यांच्या दबंगगिरीला कंटाळून अखेर जिल्हाधिकारी यांचेकडे त्यांची लेखी तक्रार करणार असल्याची माहीती गटनेता दुर्गेश ठाकुर यांनी दिली.तसेच मुख्याधिकारी मनमानी पद्धतीने कामकाज करीत असल्याने येत्या 16 जुलै रोजी होणाऱ्या सभेवर बहिष्कार करणार असल्याचाही खुलासा यावेळी करण्यात आला आहे .
आयोजित पत्रकार परिषदेत गटनेता तथा नगरसेवक दुर्गेश ठाकुर , उल्हास पगारे ,आशिक खान शेरखान , ललित मराठे ,सिकंदर खान , सचिन पाटिल , इम्तिहाज शेख यांच्यासह उपस्थित होते .
वार्डातील लोकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असून त्यांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नगरसेवक ठाकूर हे नेहमीच आपल्या वॉर्डातील समस्यांचा पाढा नगर परिषदेमध्ये मांडत असतात, मात्र त्यांच्या मागण्या व निवेदनांना केराची टोपली दाखवण्यात येत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव नागरिकांच्या समस्यांना न्याय व हक्क मिळण्यासाठी येत्या आठवड्यात नागरीकांच्या सहकार्याने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी
विरोधी पक्ष गटनेता दुर्गेश ठाकुर सह ,उल्हास पगारे व उपस्थित नगरसेवक यांनी यावेळी दिला .



