रावेरातील नकली नोटा प्रकरण : पाच संशयीतास अटक –

रावेरातील नकली नोटा प्रकरण : पाच संशयीतास अटक –
रावेर –
नकली नोटांच्या रॅकेट प्रकरणी मुख्य संशयीतासह या नोटांना चलनात वापरण्याचा प्रयत्न करणार्‍या रावेर येथील पाच जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. मध्यप्रदेशातील नकली नोटांच्या रॅकेटचे धागेदोरे हे रावेरमध्ये जुळलेले असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वीच उघड झाली होती या प्रकरणी मध्यप्रदेशातील
एकास अटक करण्यात आल्यानंतर रावेरातील संशयीतांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

रावेर येथील शेख शाकीर शेख हाफीज याने मध्यप्रदेशातून सात हजार रुपयांच्या 100 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटा रावेरात आणल्या होत्या. त्याने या नोटा असलम उर्फ राजू सुपडू तडवी 30, पाच बीबी टेकडी, रावेर), सोनू मदन हरदे 30, अफु गल्ली, रावेर , रवींद्र राजाराम प्रजापती 31, कुंभारवाडा, रावेर शेख शाकीर शेख साबीर 26, खाटीकवाडा, रावेर यांना वापरण्यासाठी दिल्या होत्या. यातील शेख शाकीर शेख हाफीज याला मध्यप्रदेशात हरदा येथून अटक करण्यात आली असून त्याचे हस्तांतरण करण्यात आले आहे. त्याची चौकशी केल्यानंतर वरील चारही जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल सचिन रघुनाथ घुगे यांनी वरील आरोपींविरोधात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक फौजदार शेख गफुर शेख कादर व पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे करीत आहेत.