वरणगाव शहरात प्रभागा निहाय स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारा ; भाजयुमो सरचिटणीस आकाश निमकर यांची मागणी


वरणगाव –
शहरात एकाच ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लसीकरण केंद्र असल्याने त्यात मर्यादित लसीचा साठा येत असल्याने नागरीकांचे लस घेण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. लस घेण्यासाठी प्रचंड गर्दी उसळत असल्याने वादही निर्माण होतात. शहरवासीयांच्या हितासाठी लसींचा कोटा वाढवण्यात यावा व प्रभागनिहाय लसीकरण केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शहर सरचिटणीस आकाश निमकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण व जिल्हा आरोग्यधिकारी पाटोळे यांच्याकडे केली आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा चिटणीस कमलाकर मराठे , उपाध्यक्ष हितेश चौधरी उपस्थित होते.
यावेळी भाजयुमोच्या वतीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात स्त्री-पुरुष तपासणी व ऑपरेशन थिएटरच्या प्रशासकीय इमारतीसाठी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्य असतंना तत्कालीन पालकमंत्री मंत्री गिरीष महाजन, माजी मंत्री आमदार संजय सावकारे, खासदार रक्षा खडसे, तत्कालीन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागोजीराव चौहाण यांच्या प्रयत्नातून 70 लक्ष रुपये मंजूर करून आणले होते. त्या इमारतीचे काम पूर्णत्वास आली असून या इमारतीत आरोग्य सेवा सुरू करावी तसेच बिनटाक्याचे ऑपरेशन सुरू करण्यात यावे व पूर्ण कर्मचारी स्टाफ नियुक्त करण्यात यावा, अशी सुद्धा मागणी भाजयुमोचे सरचिटणीस आकाश निमकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली आहे.