भुसावळ (प्रतिनिधी ) –
एखाद्या ठिकाणी जायचे असेल तर रस्त्याने जातांना अनेक अडचणी अंध व्यक्तींना भेडसावत असतात. प्रत्येक वेळी रस्ता सांगणाऱ्या व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास ठेवूनच पुढे जावे लागते. मात्र, आता अर्डिनो प्रणालीने रस्त्यातील अडथळ्यांची माहिती देणारे गॅझेट्स अंध व्यक्तींची मदत करणार आहे. दृष्टिबाधित लोकांना वेगाने जाण्यासाठी व अल्ट्रासोनिक लाटांच्या मदतीने जवळपासच्या अडथळ्यांना जाणून घेण्यास मदत होईल आणि आत्मविश्वासाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास सामर्थ्य मिळेल. भुसावळच्या हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम शाखेतील अंतिम वर्षाच्या कोमल जाधव, धनश्री बऱ्हाटे, राजश्री बडगुजर या विद्यार्थिनींनी ‘द थर्ड आय फॉर द ब्लाइंड पीपल’ ही प्रणाली प्रा.धिरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केली आहे.

हिंदी सेवा मंडळ अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव मधुलता शर्मा, कोषाध्यक्ष एम.डी. तिवारी व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डीन डॉ.राहुल बारजिभे, विभागप्रमुख डॉ.गिरीष कुळकर्णी यांनी विद्यार्थीनींच्या या समाजोपयोगी प्रकल्पाचे कौतुक केले.
इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचा वापरून अर्डिनो युनो, अडथळे शोधण्यासाठी एचसी एसआर 04 अल्ट्रासोनिक सेन्सर, डीसी मोटर,बझर, रेड एलईडी, स्विचेस, पॉवर बँक, हेडर पिन या सारखी उपकरनांच्या मदतीने ही प्रणाली काम करणार आहे. डिझाइनसाठी कमी वेळ लागला व उत्पादन खर्चही कमी आहे. कमी वीज वापरासह हलके वजन असल्याने, अंध व्यक्ती हे यंत्र सर्वत्र ठिकाणी नेऊ शकेल.
ही प्रणाली वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना ओळखून (ध्वनिलहरी) लाटा तयार करतात आणि आवाज निर्माण होतो आणि समोर अडथळा आहे असे लगेच सूचित होते. हे दृष्टिहीन लोकांना अडथळे ओळखून आरामात चालण्यास मदत करते. त्यांना फक्त हे डिव्हाइस परिधान करणे आवश्यक आहे. सध्या या प्रणालीच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात येणार आहे. लवकरच काही बदल करून ती बाजारात आणण्याचा प्रयत्न आहे असे मार्गदर्शक प्रा.धिरज पाटील यांनी सांगितले.
स्वयंरोजगाराचा मार्ग तयार केला:
या प्रणालीबाबत कोमल जाधव हिने सांगितले, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम शाखेत करियर घडवून स्वयंरोजगाराचा मार्ग तयार केला आहे याचा आनंद वाटतो. अंधांना प्रवासात विशेषत: अपरिचित ठिकाणी रस्ता नवखा असल्याने अडथळे येतात. त्यांना आम्ही विकसित केलेली ही प्रणाली उपयोगी ठरणार आहे. अंध व्यक्तींना येणाऱ्या अडचणी जाणून गरजेनुसार त्यात बदल करण्यात आले आहेत.


