भुसावळ –
मधुकर सहकारी कारखान्या लि.कडे थकीत असणारे वेतन, इतर थकबाकी आणि पी.एफ.फंडात भरली न जाणारी रक्कम आणि कारखाना व आसवनी विभाग लवकर सुरू करण्यात यावा या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मागणी होत असताना दखल घेतली जात नसल्याने वंचित बहुजन आघाडी संघटनेतर्फे सोमवार, 21 रोजी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या नेतृत्वात कामगार थेट कारखान्याचे चेअरमन यांच्या निवासस्थानी बेमुदत ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनात कर्मचार्यांना पाठिंबा दर्शवला आहे.
मसाका गेटवर जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे व वंचित बहुजन आघाडीचे यावल तालुकाध्यक्ष मनोज कापडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी सर्व कामगारांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. याप्रसंगी युनियन माजी अध्यक्ष गिरीष कोळंबे, माजी उपाध्यक्ष दामोदर कोळंबे, योगेश होले, कामगार कुमार पाटील, वसंत चौधरी, अरुण पाटील, मनमोहन महाजन, भानुदास पाटील, पुंडलिक माळी, जीवन फेगडे, शरद जावळे, राजेंद्र सोनवणे, सुनील अडकमोल, सुनील कोष्टी, संजय कोलते, देवदत्त मकासरे सह असंख्य कामगार उपस्थित होते. हमीद शाह यांनी सूत्रसंचालन केले.
कारखाना व आसवनी प्रकल्प त्वरीत सुरू करावा, कामगारांचे चाळीस महिन्यांचे वर जे थकित पगार आहे ते त्वरीत द्यावेत, कामगारांचा थकित पि एफ नाशिक ऑफिसला त्वरीत भरावा, 2013 पासून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांचे फायनल (ग्रॅज्युटी) पेमेंट त्वरीत मिळावे, कारखाना अंतर्गत संस्थांचे थकित पेमेंट त्वरीत मिळावे, कारखान्याची सर्व साधारण सभा लवकर बोलावून सदर कारखाना खाजगी अगर भाडेतत्त्वावर सुरू करण्याचा ठराव संमत करण्यात यावा आदी मागण्यांसाठी सोमवारी सकाळी नऊ वाजता
कारखान्याचे चेअरमन यांच्या निवासस्थानी बेमुदत ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.



