भुसावळातील कुविख्यात गुंड शेख काल्या भावासह वर्षभरासाठी स्थानबद्ध –


भुसावळ –
सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या भुसावळातील कुविख्यात तस्लीम उर्फ काल्या शेख सलीम (30, दीनदयाल नगर) व कलीम शेख सलीम शेख (32, दीनदयाल नगर) या भावंडावर जिल्हाधिकार्‍यांनी एमपीडीएची (स्थानबद्ध) कारवाई केल्याने शहरातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. दोघाही भावंडांविरोधात लूट, जबरी लूट तसेच मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोघांविरुद्ध एमपीडीएची कारवाई होण्यासंदर्भात पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना निर्देश दिले होते. उभयंतांचा प्रस्ताव तयार करण्यात आल्यानंतर तो जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवण्यात आला होता.
शुक्रवारी रात्री उशिराने जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी एमपीडीएच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. दरम्यान, एक वर्षांसाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून शुक्रवारी दुपारीच संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर रात्री उशिरा त्यांना जळगाव कारागृहात हलवण्यात आले.
शनिवारी संशयीतांना येरवडा वा पुणे कारागृहात हलवण्यात येणार असल्याचे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *