भुसावळ (प्रतिनिधी )-
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषध निर्माणशास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी ‘एमएचटी-सीईटी-२०२१’ ही प्रवेश परीक्षा महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे या दृष्टिकोनातून भुसावळ शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी विद्यार्थ्यांना ओम कॉम्प्युटर्स, विठ्ठल मंदिर वार्ड येथे सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, नितीन माळी, प्रवीण चौधरी, जयेश चौधरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटी २०२१ ही प्रवेश परीक्षा देणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने दिलेल्या माहितीनुसार नियमित शुल्कासह अर्जाची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ८ जून २०२१ ते ७ जुलै २०२१ (रात्री-११.५९) पर्यंत तर विलंब शुल्कासह अर्जाच्या नोंदणीसाठी ८ जुलै २०२१ ते १५ जुलै २०२१ (रात्री ११.५९) असा कालावधी दिला आहे. सदरील परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहितीपुस्तिका राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांकडून या प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यात बऱ्याचदा चूका होत असतात आणि धावपळही होत असते. त्यादृष्टीने भुसावळ दक्षिण विभागातील शहर शिवसेनेने एमएचटी-सीईटी २०२१ साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गाशी संबंधित कागदपत्रे, ओळखपत्र/आधार कार्ड, फोटो आणि अर्जाचे शुल्क भरण्यासाठी एटीएम सोबत आणणे आवश्यक आहे, असे आवाहन शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी केले आहे.



