भुसावळ ( प्रतिनिधी )-
महिलेची फसवणूक करून गाळे खरेदीस टाळाटाळ केल्या प्रकरणी येथील माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी आधी महिलेचे ६० लाख ७० हजार रूपये अदा करावेत, नंतरच जामीनसाठी अर्ज करावा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यावर आता अनिल चौधरी ते पैसे भरणार का ? व कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भुसावळ येथील महिलेकडून रुपये ६० लाख ७० हजार रुपये घेऊन गाळे खरेदी करून न देता फसवणूक केल्याप्रकरणी अनिल चौधरी यांच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे कलम ४२०, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे.
या प्रकरणी अनिल चौधरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढत फेटाळला होता. त्यानंतर अनिल चौधरी यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
या प्रकरणी दिनांक २१ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने स्पष्ट मत नोंदवले की सदर प्रकरणात असलेली वस्तुस्थिती व उच्च न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण पाहता तुम्ही आधी १९ ऑक्टोबर २०१९ रोजी घेतलेली संपूर्ण रक्कम ६० लाख ७० हजार रुपये संबंधित दिवाणी न्यायालयात दिनांक २४ मे पर्यंत जमा करा त्यानंतरच तुमच्या जामीन अर्जावर विचार करु अन्यथा सदरचा अर्ज रद्द करण्यात येईल. त्यामुळे आता अनिल चौधरींनी घेतलेली व्यवहारातील मूळ रक्कम ते संबंधित दिवाणी न्यायालयात भरतात किंवा कसे यावर सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे जर त्यांनी पैसे भरल्यास संबंधित जामीन अर्जावर दिनांक २५ मे रोजी सुनावणी होईल असे न्यायालयाच्या निकालपत्रात नमूद केले आहे.



