रेल्वे रुळ आणि विद्युतीकृत परिसरात पतंग उडवू नका! २५ हजार व्होल्टच्या विद्युत तारांमुळे जीवितहानीचा धोका; मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे नागरिकांना आवाहन

 
भुसावळ (प्रतिनिधी) :

पतंगोत्सवाच्या काळात नागरिकांनी सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी आणि रेल्वे रुळ, स्थानके, यार्ड तसेच विद्युतीकृत रेल्वे परिसरात पतंग उडवणे टाळावे, असे आवाहन मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे करण्यात आले आहे. रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक ट्रॅक्शन (OHE) तारांमधून तब्बल २५ हजार व्होल्ट (२५ केव्ही) क्षमतेचा उच्च दाबाचा विद्युत प्रवाह वाहत असल्याने पतंगाची दोरी किंवा मांजाचा संपर्क आल्यास गंभीर अथवा प्राणघातक अपघात होण्याची शक्यता आहे.

रेल्वेच्या ओव्हरहेड विद्युत तारांना पतंगाची दोरी किंवा मांजा स्पर्श झाल्यास त्यातून विद्युत प्रवाह वाहू शकतो. एवढेच नव्हे, तर विद्युत प्रभाव क्षेत्रात (Inductive Zone) दोरी गेल्यासही विजेचा धक्का बसण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. भारतीय रेल्वेच्या विविध विभागांमध्ये यापूर्वी अशा घटना घडल्या असून, विद्युत तारांमध्ये अडकलेल्या पतंगाच्या दोरीच्या संपर्कात आल्याने अनेकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत, तर काही घटनांमध्ये जीवितहानीही झाली आहे.

रेल्वे वाहतुकीतही निर्माण होऊ शकतो मोठा व्यत्यय

पतंगाची दोरी किंवा मांजा धावत्या रेल्वेगाडीच्या पॅन्टोग्राफमध्ये अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे ओव्हरहेड इलेक्ट्रिक उपकरणांचे (OHE) नुकसान होऊन रेल्वे वाहतुकीत मोठा व्यत्यय निर्माण होऊ शकतो. परिणामी गाड्यांना विलंब होणे, प्रवाशांची गैरसोय होणे तसेच रेल्वेच्या महत्त्वपूर्ण मालमत्तेचे नुकसान होण्याचा धोका आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई

रेल्वे परिसरात पतंग उडवून रेल्वेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या अथवा रेल्वे मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध रेल्वे अधिनियम, १९८९ मधील लागू तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही रेल्वे प्रशासनाने दिला आहे.

नागरिकांनी सहकार्य करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन

स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता लक्षात घेऊन नागरिकांनी रेल्वे रुळ, स्थानके, यार्ड आणि विद्युतीकृत रेल्वे परिसरात पतंग उडवू नयेत. आनंदोत्सव साजरा करताना सुरक्षिततेचे भान ठेवून संभाव्य अपघात टाळावेत आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने केले आहे.