भुसावळ (प्रतिनिधी ) –
शहरातील रेल्वे कॉलनी परिसरातील पोलीस चौकीच्या परिसरात एकाचा खून झाल्याची घटना आज शनिवार रोजी दुपारी १२ वाजेचे दरम्यान उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील उत्तर रेल्वे भागातील आगवाली चाळ परिसरातील पंजाबी मशिदीच्या समोर आज शनिवार रोजी पत्र्यांच्या खाली एक मृतदेह आढळून आला. खून झाल्याची चर्चा वाऱ्यासारखी परिसरात पसरताच परिसरातील नागरिकांनी याबाबतची माहिती शहर पोलीस स्थानकात दिली. यानुसार त्वरीत पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी परिसरात चौकशी करताच खून झालेल्या व्यक्तीचे नाव सुनील अरूण इंगळे (वय 35 ) रा. समतानगर रेल्वे दवाखाना मागे, भुसावळ हा असल्याचे निष्पन्न झाले. खून रात्री बाराच्या सुमारास झाला असून मयताच्या अंगावर धारदार हत्याराने वार करण्यात आलेले असून त्याला दगडाने ठेचण्यात आल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी याच रोडवर एका रिक्षावाल्याची सुद्धा दगडाने ठेचुन हत्या झाली होती. यानंतर पुन्हा एक खून आणि तो देखील पोलीस चौकीच्या नजिक भागात झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, खुनाची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती जाणून घेतली. त्यांच्या सोबत डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, शहर पोलीस स्थानकाचे निरिक्षक बाळासाहेब ठोंबे आणि त्यांच्चे सहकारी कर्मचारी देखील होते.
मित्रानेच केला मित्राचा खून ?– संशयित पोलिसांच्या ताब्यात ; –
दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी मित्र म्हणून नेहमी सोबत राहणारा मयताचा मित्र शहाबत शहा यास प्रथम दर्शनी संशयित म्हणून ताब्यात घेतले असून खून का व कश्यासाठी केला या प्रकरणी त्याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली.



