भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरात लग्नासाठी आलेल्या इंदौरच्या विवाहितेच्या गळ्यातून धूम स्टाईल आलेल्या चोरट्यांनी तीन तोळे वजनाचे व एक लाख 20 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र लांबवल्याची घटना रविवारी सकाळी 11.30 जामनेर रोडवर घडली. या घटनेने शहरातील महिलावर्गात भीती पसरली असून शहरात वाढती गुन्हेगारी पुन्हा यानिमित्ताने चर्चेत आली आहे. इंदौर येथील विवाहिता आशा संजयकुमार अत्रे (40) या पती संजयकुमार यांच्यासह नातेवाईकांच्या लग्नासाठी भुसावळात आल्या होत्या. रविवारी सकाळी 11.30 वाजता त्या पतीसोबत रस्त्याने जात असताना अचानक पाठीमागून काळ्या रंगाच्या व विना क्रमांकाच्या दुचाकीवरून 25 ते 30 वयोगटातील चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे मंगळसूत्र लांबवत पळ काढला. विवाहितेने आरडा-ओरड केली मात्र चोरटे तोपर्यंत पसार झाले. घटनेची माहिती कळताच सहा.अधीक्षक अर्चित चांडक व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या परीसरातील सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.



