भुसावळात तरुणाचा खून : चौघे आरोपी जाळ्यात ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील पंचशील नगर भागात जुन्या वादाच्या कारणावरून १६ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या डोक्यात रॉड टाकून खून करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री १० वाजता घडली होती. या प्रकरणी चारही आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य एक आरोपीचा कसून शोध सुरू आहे. मोहम्मद कैफ शेख जाकीर (१७) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, भुसावळात क्षुल्लक कारणावरून खुनाच्या घटना आता सातत्याने घडत असल्याने पोलिस प्रशासनाने मरगळ झटकून गुन्हेगारीचा बीमोड करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.रविवारी रात्री शहरातील पंचशील नगरात खून झाल्याची घटना कळताच बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत व बाजारपेठ पोलिसांनी धाव घेतली तसेच रात्रभर हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला. या प्रकरणी शेख समीर शेख जाकीर (पंचशील नगर, मदिना मशीदजवळ, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.खुनानंतर आरोपी पसार होण्याच्या बेतात असल्याची माहिती बाजारपेठ गुन्हे शोध पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी सोमवारी पहाटे खडका चौफुली परीसरात सापळा रचून आरोपी धम्मप्रिय उर्फ धम्मा मनोहर सुरळकर (१८), समीर उर्फ कल्लू अजय बांगर (१८), आश्‍विन उर्फ गोलू अजय बांगर (२१), शुभम पंडित खंडेराव (१८, सर्व रा.पंचशील नगर, भुसावळ) यांना अटक केली. या गुन्ह्यात एक संशयीत पसार असून त्याचा कसून शोध सुरू आहे. पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहा.पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, नाईक किशोर महाजन, उमाकांत पाटील, रमण सुरळकर, संदीप परदेशी, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्‍वर भालेराव, चेतन ढाकणे, सचिन चौधरी, सुभाष सावळे, कृष्णा देशमुख आदींनी केली.
बाजारपेठ पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी विकास सातदिवे यांच्या आजीचे निधन झाले असून कुटुंबावर आघात झाला असतानाही भुसावळात रविवारी रात्री खून झाल्याची माहिती कळताच ते कर्तव्यावर हजर झाले व रात्री उशिरापर्यंत त्यांनी आरोपींचा शोध घेत त्यांच्या पथकाला सोबत घेवून मुसक्या आवळल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *