रेल्वेतून बेकायदेशीररित्या सोने वाहतूक ; आरोपीस एक वर्ष शिक्षा ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून बेकायदेशीरपणे दोन कोटी 8 लाख 500 रुपये किंमतीचे 8 किलो सोने घेऊन जाताना मुंबई येथील देवांग शहा यास लोहमार्ग पोलिसांनी जानेवारी 2015 मध्ये अटक केली होती. या प्रकरणात रेल्वे न्यायालयाने मंगळवारी निकाल देत आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.
गोपनीय माहितीवरून लोहमार्ग पोलिसांची कारवाई
9 जानेवारी 2015 रोजी देवांग शहा (रा.नालासोपारा, मुंबई) हा ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून कोलकाता ते मुंबई असा प्रवास करत होता. त्याच्याकडे सोने असल्याची माहिती तत्कालीन पोलिस निरीक्षक आनंद महाजन यांना मिळाली. यानंतर त्यांनी रेल्वे स्थानकावर सापळा रचून संशयीत शहा याला रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याजवळ 2 कोटी 8 लाख 500 रुपये किमतीचे आठ किलो सापडले होते. हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. हा खटला भुसावळ रेल्वे न्यायालयात चालला. त्यात न्यायाधीश एच.डी.देशिंगे यांनी पाच जणांच्या साक्ष नोंदवल्या. यानंतर मंगळवारी आरोपी देवांग शहा याला एक वर्ष सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिन्याची अतिरिक्त शिक्षा ठोठावली. याप्रकरणी जीआरपीचे पोलिस निरीक्षक डी.एस.डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक लांडगे, दुर्योधन तायडे यांनी या खटल्याच्या कागदपत्रांची पूर्तता केली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. राकेश चौधरी, तर पैरवी अधिकारी म्हणून दिवाणसिंह राजपूत यांनी काम पाहिले. पोलिसांनी त्यावेळी जप्त केलेली सोने अद्यापही शासनाच्या कस्टडीट आहे. आरोपीला शिक्षा झाल्याने आम्ही केलेल्या तपासाचे चीज झाले, असे तत्कालीन निरीक्षक ए.जे.महाजन म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *