भुसावळ (प्रतिनिधी) : केळी पीकविम्याच्या भरपाईप्रकरणी वरणगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करत, त्यांना त्यांच्या नुकसानीची योग्य भरपाई मिळवून देण्यासाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची पुरेपूर भरपाई मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन चर्चा केली जाईल आणि योग्य तो मार्ग काढून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी दिली. वरणगाव महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविम्याची योग्य भरपाई मिळत नसल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने हा प्रश्न प्रशासनासमोर मांडण्यात आला. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन विमा कंपनीने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार संपूर्ण नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. “शेतकऱ्यांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही” यावेळी समाधान महाजन म्हणाले की, “वरणगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांवर केळी पीकविम्याच्या बाबतीत झालेला अन्याय खपवून घेतला जाणार नाही. पीकविमा कंपनीला धडा शिकवू. मायबाप शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू.” शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेना ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रश्नावर शिवसेनेचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील आणि राज्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्याशीही चर्चा करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून वरणगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे समाधान महाजन यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईकडे लक्ष केळी हे परिसरातील शेतकऱ्यांचे महत्त्वाचे नगदी पीक असल्याने पीकविम्याची भरपाई वेळेत आणि योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने व विमा कंपनीने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आता संबंधित अधिकारी आणि विमा कंपनी याप्रकरणी कोणती कार्यवाही करतात, याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, शिवसेना उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, वरणगाव येथील शिवसेना नगरसेवक विनोद झोपे तसेच शेतकरी रामा मकडू बोंडे, संजय पितांबर झोपे, विनोद सुपडू कोळी, बाली भंगाळे, रणधीर कोळी यांच्यासह इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.


