भुसावळ प्रतिनिधी : शहरातील साक्री फाटा परिसरातील फार्म हाऊस येथे एका तरुणाला मारहाण करून त्याची हत्या केल्यानंतर मृतदेह राष्ट्रीय महामार्गालगत अलीशान वॉटर पार्कसमोरील ब्रिजजवळील सर्व्हिस रोडवर टाकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच तपासादरम्यान आणखी एका आरोपीचा सहभाग निष्पन्न झाला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.मयत तरुणाचे नाव भुषण उल्हास व्हावले असे आहे. या प्रकरणी विशाल उल्हास व्हावले (वय २५, रा. भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा रजिस्टर क्रमांक ५१४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशांच्या वादातून तरुणाची हत्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार, भुषण उल्हास व्हावले यांना संजय दत्तू आवटे आणि त्याच्यासोबत असलेल्या अन्य दोन व्यक्तींनी साक्री फाटा परिसरातील फार्म हाऊस येथे बोलावून घेतले होते. भुषण यांनी संजय आवटे यांच्याकडून पैसे घेतले होते. हे पैसे परत केले नसल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर भुषण यांना कोणत्यातरी हत्याराने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. हत्येनंतर मृतदेह भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत अलीशान वॉटर पार्कसमोरील ब्रिजजवळील सर्व्हिस रोडवर टाकून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. गोपनीय माहितीवरून पोलिसांची तातडीने कारवाई घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या आदेशानुसार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक सक्रिय करण्यात आले. तपासादरम्यान पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गोपनीय बातमीदारामार्फत या गुन्ह्यातील आरोपी भुसावळ शहरातून फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने हालचाली करत संजय दत्तू आवटे आणि प्रमोद बलराम लाहोरिया या दोघांना ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत ही कारवाई करण्यात आली. तिसऱ्या आरोपीचाही सहभाग निष्पन्न पोलिसांच्या पुढील तपासात अफसर रफीक मेमन ऊर्फ गुड्डू याचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, यासह गुन्ह्याच्या अनुषंगाने विविध बाबींचा तपास केला जात आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार, हत्येमागील नेमके कारण आणि घटनेशी संबंधित इतर पुरावे यांचा शोध पोलीस घेत आहेत. तपास पथकाची कामगिरी या कारवाईत बाजारपेठ पोलीस ठाण्याचे दुय्यम अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील, पोलीस उपनिरीक्षक मो. अली सैय्यद तसेच डी.बी. पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश माळी, भूषण चौधरी, प्रशांत सोनार, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, चंद्रकांत रायपुरकर, जावेद शहा, जीवन कापडे आणि अशोक बाविस्कर यांनी सहभाग घेतला. या हत्येच्या प्रकरणाचा पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस करीत आहेत.


