भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील आयएमए व ब्राह्मण संघाचे माजी अध्यक्ष तथा प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.उमेश मनोहर खानापूरकर (वय ६४) यांचे २८ रोजी पहाटे कोरोनाने निधन झाले.
१५ दिवस कोरोनाशी लढा दिल्यानंतर त्यांनी मुंबईतील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कोरोनाने मृत्युमुखी पडलेले ते भुसावळ शहरातील पहिले डॉक्टर आहेत.
गरिबांचे मसिहा अशी ओळख असलेले डॉ.उमेश खानापूरकर हे ११ आॅगस्ट रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांना १३ रोजी मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. २८ रोजी पहाटे रुग्णालयातच त्यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांच्याजवळ पत्नी व मुलगी होते.
सायंकाळी त्यांचे चिरंजीव डॉ.समीर खानापूरकर मुंबईत दाखल झाले. रात्री त्यांच्यावर मुंबईतच अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी डॉ.सुषमा खानापूरकर, मुलगा बालरोगतज्ज्ञ डॉ.समीर खानापूरकर, मुलगी फिजिओथेरपी डॉ.रश्मी कुलकर्णी, सून डीएनबी मेडिसिन डॉ.गौरी खानापूरकर, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे.



