भुसावळ (प्रतिनिधी )-
गेल्या २० वर्षांपासून नशिराबाद जवळ सुरू असलेल्या ओरिएंट सिमेंट फॅक्टरीत कामावर असलेल्या कामगारांवर कंपनी प्रशासनातर्फे अन्याय केला जात असून त्यांना कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रीय मजदुर सेनेसह १० संघटना त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणार असल्याचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी सांगितले.ते आज दि.७ रोजी या संदर्भात पोलीस अधिका-यांशी चर्चा केल्यानंतर भिमालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जगन सोनवणे पुढे म्हणाले कि,या कंपनीत ६०० कामगार कामाला असून त्यांना साप्ताहिक सुट्टी दिली जात नाही.मनमानी पध्दतीने ११ कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले.जळगाव येथील त्यांच्या कंपनीचा खास माणूस सचिन नारळे याची जास्त मनमानी चालत असून कामगारांना विविध प्रकारच्या धमक्या दिल्या जातात.वेतनवाढ दिली जात नाही,पगार स्लीप नाही,महागाई,रात्रपाळी भत्ता व सीएल,पीएल द्यावा,कॅन्टीन सुविधा मिळावी,सिमेंट लोडींग करतांना नजरचुकीने एक-दोन बॅग जास्त सिमेंट गाडीत आढळल्यास ५-६ हजार रू.दंड कामगारांना करणे बंद व्हावे,कंपनी प्रशासनाला बदनाम करणा-या व गरीब कामगारांना धमकी देणा-या सचिन नारळे यांचा कंत्राट बंद करावा आदी मागण्यांसाठी हा लढा आहे.
या मागण्यांसाठी १० आॅगस्ट रोजी कंपनी गेटसमोर अर्धनग्न महामोर्चा,दि.१५ रोजी तिरंगा चेतावणी उपोषण प्रांत कार्यालयावर व जिल्हाभरात ठिकठिकाणी रेल्वे रोको आंदोलन करण्याचा ईशारा प्रशासनाला देण्यात आला होता.तत्पुर्वी बाजारपेठ पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,नशिराबाद पोलीस ठाण्याचे सपोनि.श्री.साळूंके यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून आपण याबाबत ओरिएंट फॅक्टरी प्रशासनाशी या विषयावर बोलले असून त्यांनी सकारात्मक उत्तर दिल्याने व कोरोना मुळे आंदोलन न करण्याची नोटीस दिल्याने शक्यतो आंदोलनाची वेळ येणार नसल्याचे म्हटले आहे.पोनि.दिलीप भागवत यांचेही सहकार्य लाभले.
याप्रसंगी राकेश बग्गन,हरीश सुरवाडे,कामगार अध्यक्ष सचिन भालेराव,उपाध्यक्ष लक्ष्मण तायडे,सचिव तुषार पाटील,संघटक जितेंद्र ब-हाटे,सह सचिव तेजस कोळी,कोषाध्यक्ष मुकेश पाटील,सल्लागार दिपक झोपे,सदस्य अरूण केदार,संतोष भोई,किरण पाटील,अमोल माळी,आबा महाजन,संदीप पाटील,निखील चौधरी,महेश भंगाळे,संजय कोळी आदी उपस्थित होते.



