भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाचे काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भुसावळ प्रांताधिकारी यांचेकडून वारंवार एफआयआर दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात नसल्याचा आरोप संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी केला आहे .
आपल्या जिवाची पर्वा न करता अंगणवाडी केंद्राचे नियमित काम सांभाळून प्रशासनाच्या तोंडी आदेशानुसार भुसावळ शहरातील अंगणवाडी कर्मचारी गेल्या तीन महिन्यापासून कोरोनाचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून नगरपालीका आरोग्य विभागाला दररोज माहिती देत आहेत.
कोरोनाचे काम करतांना वेळोवेळी लेखी व तोंडी मागणी करूनही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मास्क, सँनिटायझर, ग्लोज आदी सुरक्षिततेचे साहित्य आजतागायत देण्यात आले नाही. कोणत्याही सुरक्षा विना कंटेंमेंट झोनसह अन्य भागात काम करत आहेत.
गरोदर, वयस्कर, अपंग, मधुमेह, रक्तदाब, दमा यासह अन्य व्याधी असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे कागदपत्रे दाखवूनही अशा महिला कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या कामाची सक्ती प्रातांधिकारी यांच्याकडून केली आहे. त्यामुळे जिवित हानी झाल्यास होऊ शकते.
अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी केंद्राचे टीएचआर वाटप करणे, ऑनलाइन लाभार्थ्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे, अंगणवाडी केंद्राची माहिती दररोज सीएएस मध्ये यादी कामे सुरू असतांना कोरोनाच्या तपासणी दररोज प्रत्येकाने किमान पाच ते दहा व्यक्तिंना स्वँब देण्यासाठी कोवीड सेंटरला पाठवलेच पाहिजे. अन्यथा तुमच्यावर एफआयआर दाखल करू अशा सक्त धमक्या प्रांताधिकाऱ्यांकडून दिल्या जात आहेत.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्राचे काम करावे कि कोरोनाचे करावे असा संभ्रम निर्माण झाला आहे तसेच एफआयआरच्या धमक्यामुळे मानसिक दडपणाखाली काम करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचे नियमित काम करूनही प्रातांधिकारी आणि न.पा. आरोग्य अधिकारी यांनी एफआयआर दाखल करण्याच्या धमक्या देणे बंद न केल्यास अंगणवाडी कर्मचारी कोणत्याही क्षणी कोरोनाचे काम बंद करतील आणि होणाऱ्या परिणामांना प्रांताधिकारी तसेच न.पा.आरोग्य अधिकारी यांची जबाबदार राहतील.असा इशारा संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी दिला आहे.



