भुसावळ (प्रतिनिधी )-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा २२ वा दीक्षांत समारंभ सोमवार, २९ जून रोजी सकाळी ११ वा. ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. या वर्षीच्या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी भूषविणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. व्ही. आर. शास्त्री कार्यक्रमाची प्रस्थावना मांडतील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठांतर्गत शिकवले जाणारे अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर व तंत्रशास्त्रसलग्न अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या १२०४ विद्यार्थी-विद्यार्थीनींना पदवी प्रदान करण्यात येईल. ६ पीएचडी, ७४ एम टेक, ६७२ बीटेक, ४५२ पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाईल. दरवर्षी विद्यापीठाचे कोर्सेस यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यासाठी दिक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात येते परंतु या वर्षी देशभरात उद्भवलेल्या कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी विद्यापीठाने ऑनलाईन पद्धतीने दिक्षांत समारंभाचे आयोजन केले आहे. संपूर्ण देशभरात पहिल्यांदा अश्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून नवीन संकल्पना मांडली गेली आहे.

कुलपती मा. भगत सिंह कोश्यारी स्नातकांना उद्देशून दिक्षांत समारंभात पुढील जीवनात यशस्वीतेचा टप्पा गाठण्याकरिता मार्गदर्शन करतील.
कुलगुरू डॉ. व्ही. आर. शास्त्री गेल्या वर्षभरापासून विद्यापीठाच्या अलीकडील घडामोडींचा अहवाल मांडतील. सध्याच्या यंत्रणेला सक्षम बनविण्यासाठी प्रशासकीय प्रणालीत विविधता आणणे, विद्यापीठातील संशोधन उपक्रमांना प्रोत्साहन देणे, युजीसीच्या निकषांनुसार संशोधन पर्यवेक्षकाची मान्यता देऊन संशोधन केंद्रे स्थापन करणे. 2020-21 या शैक्षणिक वर्षाच्या 20% अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे आणि संपूर्ण अभ्यासक्रमांमध्ये ऑनलाईन शिक्षण-प्रशिक्षण सक्तीचे करणे, अंतिम सत्रात इन्टर्नशिप / प्रोजेक्टच्या संकल्पना वाव देणे, अभ्यासक्रमात नवनिर्मितीची संधी वाढविणे, डिजिटल पध्दतीने मूल्यमापन करणे तसेच अभ्यासक्रमामध्ये पहिल्या वर्षापासून अनिवार्य होणारे व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण इ. च्या सविस्तर माहिती देणार आहे.
cisco webex या तांत्रिक प्रणालीच्या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. तसेच विद्यापिठाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून संपूर्ण कार्यक्रम प्रक्षेपित केला जाणार आहे. फेसबुक पेजची लिंक https://www.facebook.com/Dbatu-live 104228437589411/ ही आहे.
महाराष्ट्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठांतर्गत कार्यरत कार्यकारी परिषद सदस्य, शैक्षणिक परिषद सदस्य, संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व आस्थापना सदस्य, प्राध्यापक, विद्यार्थी व भावी अभियंते यांना ऑनलाईन उपस्थितीचे आवाहन विद्यापीठ असोसिएट डीन डॉ.राहुल बारजिभे यांनी केले आहे.


