साकेगावजवळ अज्ञात वाहनाची रुग्णवाहिकेला धडक : महिला डॉक्टर ठार ; चालक गंभीर जखमी ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
अज्ञात भरधाव ट्रकने रुग्णवाहिकेला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात भुसावळातील महिला डॉक्टरांचा मृत्यू झाला तर रुग्णवाहिका चालक गंभीर जखमी झाला. गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास साकेगाव जवळील कपूर पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. या अपघातात रुग्णवाहिकेतील महिला डॉ. अंशुजा तोताराम पाटील (४३, तापी नगर, रा.भुसावळ) या जागीच ठार झाल्या तर रुग्णवाहिका चालक समाधान अनिल चौधरी (२७, रा.भुसावळ) हा गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर अज्ञात ट्रक चालक पसार झाला.
भुसावळ तालुक्यातील ही १०८ रुग्णवाहिका (एम.एच.१४, सी.एल ०८०१ )वर समाधान अनिल चौधरी (२७, रा.भुसावळ) हे चालक असून ते व डॉ.अंशुजा पाटील या रुग्णवाहिकेने जळगावला येत असतांना समोरून येणार्‍या अज्ञात भरधाव ट्रकने समोरून जोरदार धडक दिल्याने महिला डॉक्टर जागीच ठार झाल्या तर चालकाच्या डोेक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सचिन कापडणीस, संतोष इदा आदींनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, डॉक्टरांच्या मृत्यूप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *