एकत्र कुटुंब पद्धतीतून संस्कारांची रूजवण प्राचार्य डॉ. महेंद्र कदम : शिक्षकांसह विद्यार्थ्यांना घडवले ग्रामसंस्कृतीचे दर्शन

भुसावळ (प्रतिनिधी )-
ग्रामीण संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती होय. कौटुंबिक नातेसंबंध जपणारी व कुटुंबातील सगळ्यांचा आधार असणारी कुटुंबप्रमुख आजी म्हणजे सर्व कुटुंबाला एकत्रित बांधून ठेवणारी आगळ (दरवाजाचा लाकडी दांडा) असते. अलीकडच्या काळात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे बऱ्याच ठिकाणी याचा अभाव आढळतो. आधीच्या पिढीतील संस्कार पुढे सुरू ठेवण्यासाठी किंबहुना संस्कारांची रूजवण करण्यासाठी एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे दहावी मराठी पाठ्य पुस्तकातील आजी : कुटुंबाचे आगळ या पाठाचे लेखक प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांनी सांगितले.
जळगाव जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे सुरू असलेल्या ऑनलाईन संवाद सत्राचे द्वितीय पुष्प डॉ. कदम यांनी गुंफले. प्रारंभी दिलीप वैद्य यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन व नियोजन मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले. डॉ. कदम म्हणाले की, समाजात निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे काम लेखक आपल्या लेखणीतून करतो. तो शोषण नाकारतो आणि शोषणाला विरोध करून त्यांच्या बाजूने उभा राहतो. समाजीकरणामध्ये हस्तक्षेपाचे काम करणारे हत्यार म्हणजे साहित्य होय. इतिहास समजून घेण्यासाठी आपण साहित्याकडे वळतो. वंचितांच्या इतिहासाच्या लेखनाची दिशा अधोरेखित करणे लेखकाचे आद्यकर्तव्य असते. व्यावसायिक व नोकरीच्या निमित्ताने शहरी भागाकडे वळलेल्या पिढीला ग्रामसंस्कृती थोड्याफार प्रमाणात माहिती आहे. परंतु नव्याने आलेल्या पिढीला ग्रामसंस्कृती माहिती नसल्याने आगळ नावाची कादंबरी ही ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी महत्वपूर्ण ठरली आहे, असेही डॉ. कदम म्हणाले. त्यांनी आपल्या संवाद सत्रात लेखकाची लेखनामागची भूमिका, वास्तव व प्रेरणा सांगून आगळ कादंबरी निर्मितीची प्रक्रिया सांगितली. तसेच आजी : कुटुंबाचं आगळ या पाठाविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. कदम यांनी उत्तरे दिली. झूम ॲपद्वारे झालेल्या सुमारे ऐंशी मिनीटांच्या ऑनलाईन संवाद सत्रात संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो शिक्षक सहभागी झाले होते. यशस्वीतेसाठी डॉ. जगदीश पाटील भुसावळ, वंदना भिरूड भुसावळ, दिलीप वैद्य रावेर, निर्मल चतुर यावल, संजय ठाकूर मुक्ताईनगर, व्ही.एन. पाटील जामनेर, दीपक चौधरी बोदवड, किशोर चौधरी मुक्ताईनगर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *