भुसावळ ( प्रतिनिधी )-
कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण रोखण्याकरीता सुरुं असलेल्या लॉक डाऊन मध्ये पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे याचा फायदा येथील कारागृहातील एका क़ैदयाने घेत पोलिसांच्या हातावर तुरी देवून जेल मधून पळ काढला . मात्र कैदी पळाल्याचे लक्षात येताच
पोलिसांनी कैदयाचा सिनेस्टाईलरित्या पाठलाग करून त्याला जेरबंद केल्याची खळबळजनक घटना १४ एप्रिल रोजी घडली.
आकाश श्रीओम बारसे (राहणार चांदमारी चाळ) यास अलीकडेच अटक करण्यात आली असून तो सध्या येथील कारागृहात आहे. मंगळवारी सकाळी तुरुंग अधिकारी व कर्मचार्यांनी कैद्यांना जेवणासाठी बाहेर काढले. यावेळी आकाश बोरसे हा लघवीचे निमित्त करून मुतारीत गेला. तेथून नजिकच्या तहसील कार्यालयाच्या रेकॉर्ड रूमच्या भिंतीवरून उडी मारून त्याने पलायन केले. हा प्रकार कारागृह शिपायाच्या लक्षात आला व त्यांनी त्वरित आरडाओरड केली. यावेळी काही अधिकारी, कर्मचार्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत त्यांना हा प्रकार सांगितला.
पोलिसांनी त्वरित फरार आरोपी डी. एस. हायस्कूल च्या पाठीमागून पळाल्याचे लक्षात आले व पोलिसांनी पाठलाग करून रेल्वे न्यायालय आवारात लपून बसलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि पुन्हा कारागृहात टाकले. याबाबत तुरुंग रक्षक भानुदास यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



