भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना विषाणू आणि त्यामुळे होणारा कोविड -१९ ह्या आजारांपासून आपण स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि देशाला नक्कीच वाचवू शकतो असा आत्मविश्वास येथील स्त्री रोगतज्ञ डॉ सौ सुषमा खानापूरकर यांनी व्यक्त केला असून नागरिकांना आवाहन केले आहे . वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून सुद्धा साहित्याच्या आवडी बरोबरच डॉ. खानापुरकर या स्वत: दररोज नियमित योगासन – प्राणायाम करत असतात .त्यांनी अतिशय मार्मिक शब्दात कोविड १९ बद्दलची दाहकता व त्यावर घ्यावयाची खबरदारी “अदृश्य आहे हा शत्रू ,” या कवीतेच्या माध्यमातून व्यक्त करीत घरात रहा खबरदारी घ्या असे सांगून सोशल मिडियाद्वारे आवाहन केले आहे .
आजच्या घडीला सगळया जगाला कोरोना ह्या विषाणु मुळे होणाऱ्या कोविड -१९ ह्या आजाराने विळखा घातलाय, सगळेजण घाबरले आहेत. धीर धरा मंडळी, फक्त घरात शांतपणे बसून रहा. जिथे आहात तिथेच थांबा. बाहेर जाऊ नका. अगदी लवकरच आपण सगळेजण मोकळा श्वास घेऊ शकणार आहोत. याठीच आपले सरकार, आपले प्रशासन ,पोलिस आणि डॉक्टर्स् आणि त्यांचा स्टाफ आपल्याला सर्वतोपरी मदत करीत आहेत. आपणही त्यांना संपूर्ण सहकार्य करायचे आहे. करणार ना सहकार्य? थांबणार ना घरात शांतपणे अशी डॉ सुषमा खानापूरकर यांनी कळकळीची विनंती सुद्धा केली आहे .
घराबाहेर जाऊ नका ,हे सांगण्याकरीता अदृश्य आहे हा शत्रू, ही कवीता सादर करून याचे माध्यमातून जनतेला आवाहन केले आहे .
अदृश्य आहे हा शत्रू
लढावे कोणाशी कळेना
विनाश ह्याचे लक्ष्य आहे
मनुष्य ह्याचे भक्ष्य आहे
पाऊल घसरु देऊ नकोस
घराबाहेर जाऊ नकोस
जाऊ नकोस जाऊ नकोस
अदृश्य आहे हा शत्रू
हादरवून सोडलंय जगाला
रडवलं आहे या विश्वाला
धास्तावले आहेत जीव सारे
तू जपून वाग, चुकू नकोस
घराबाहेर जाऊ नकोस
जाऊ नकोस जाऊ नकोस
अदृश्य आहे हा शत्रू
एक पाऊल चुकीचे, आणि
गुदमरून मरतील कितीजण
आजवर चुकलास पुरे झाले
पृथ्वीवर नरक आणू नकोस
घराबाहेर जाऊ नकोस
जाऊ नकोस जाऊ नकोस
अदृश्य आहे हा शत्रू
व्यवहारात संयम ठेव
जाणत्यांचा सल्ला ऐक
घराचे दार बंद ठेव
मस्तीमध्ये नाचू नकोस
घराबाहेर जाऊ नकोस
जाऊ नकोस जाऊ नकोस
डॉ सौ सुषमा खानापूरकर यांनी ही कवीता सादर केली आहे .
कोरोना विषाणू आणि त्यामुळे होणारा कोविड- १९ ह्या आजारांपासून आपण स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि देशाला नक्कीच वाचवू शकतो.याकरीता स्टे होम स्टे सेफ याच बरोबर असा सल्लाही दिला .याचबरोबर इम्युनिटी वाढविण्याकरिता योग्य आहारा सोबत दररोज नियमित योगासन – प्रणायाम करावे ,असेही आवाहन यावेळी डॉ खानापुरकर यांनी केले .



