भुसावळ (प्रतिनिधी )-
जगात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरस वर प्रतिबंधात्मक उपाय करून मात करण्यासाठी सर्वानी खबरदारी घ्यावी याकरीता
भुसावळात शिवसेनेचे शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी घरोघरी जावून जनजागृती सुरु केली आहे .
भुसावळ परिसरात विविध संघटनांकडून कोरोना विषाणू बाबतीत जनजागृती मोहीम उभारली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईत 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाला उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या अन्य समस्याही होत्या. याआधीही दिल्ली कोरोनाची लागण झालेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीचं निधन झालं होतं.
चीनमध्ये जेवढ्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यातही वयोवृद्धांची संख्या अधिक असल्याचे दिसले. यावरून हे दिसून येतं की, वयोवृद्धांची या काळात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. वयोवृद्ध लोकांची रोगप्रतिकारकशक्ती इतरांच्या तुलनेत अधिक कमजोर असते. अशात त्यांना लागण होण्याचा धोका अधिक आहे.
नागरिकांशी चर्चा करतांना जेष्ठ नागरिकांना कोरोना विषाणूची माहिती कमी आहे असे जाणवले, त्यामुळे त्यांच्या घरातील लोकांना व त्यांना माहिती देण्यासाठी भुसावळ शहर शिवसेनेतर्फे शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी जनजागृती सुरू केली आहे.
वृद्धांना चांगला आहार द्यावा: बबलू बऱ्हाटे
घरात वृद्धांना रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारा आहार घ्यावा. त्यासाठी फळांचा आणि वेगवेगळ्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. त्यांना आजारी पडतील असे कोणतेही थंड पदार्थ देऊ नका. सहज पचन होतील असेल पदार्थ द्या आणि जास्तीत जास्त पाणी पिण्यास सांगा.
घरातील वृद्ध व्यक्तींना एका रूममध्ये थांबण्यास सांगा. त्यांना घरा बाहेर जाण्यास मनाई करा. जर त्यांना खोकला किंवा ताप असेल तर त्यांच्या संपर्कात जास्त येऊ नका. त्यांना भेटण्यासाठी कुणीही बाहेरचं येणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच त्यांना सतत सर्जिकल मास्क वापरण्यासाठी द्यावा. मास्क एक दिवसांनी बदला. त्यांच्या वस्तूंना स्पर्श करू नका. त्यांना सॅनिटायजरने हात धुण्यास सांगा अश्या सूचना नागरिकांना दिल्या.
वयोवृद्ध लोक ज्यांना आधीच काही आजार असतील जसे की, अस्थमा, मधुमेह आणि हृदयरोग अशा लोकांना कोरोना व्हायरसची लागण होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे ज्या लोकांची रोगप्रतिकारकशक्ती कमजोर असते त्यांना याची लागण होण्याचा धोका अधिक असतो म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.


