ग्रामसेवकास शिवीगाळ व धक्काबुक्की, जि.प.सदस्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा

भुसावळ- तालुक्यातील साकेगाव येथील ग्रामसेवकास धक्काबुक्की करीत जातीवाचक शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्‍या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील यांच्यासह त्यांचे बंधू प्रमोद पाटील आणि अमोल मांडे यांच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिसात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकेगावचे ग्रामविकास अधिकारी गौतम वाडे यांनी गावात घरपट्टी आणि पाणीपट्टीची थकीत कर वसुलीसाठी मोहिम सुरू केली असून १ मार्चला ग्रामपंचायतीचे कर्मचारी मयूर चौधरी, राहुल चौधरी, निलेश सपकाळे, कैलास सपकाळे, अनिल चौधरी, रमजान पटेल आदींसह घरोघरी जाऊन करवसुली करीत असताना पवार गल्लीतील संजय मांडे यांच्याकडे ४१ हजार ३३३ रुपये थकबाकी असल्याने त्यांच्या घरी गेल्यानंतर घरासमोर वयोवृध्द महिला तूर धान्य पाण्याने धूत असताना घरातील माणसे आल्यावर त्यांना कर भरण्यास सांग, असे सांगितल्याचा राग आल्याने प्रमोद पाटील यांनी हुज्जत घातली. तर जिल्हा परीषदेचे सदस्य रवींद्र पाटील, अमोल मांडे यांनी कर वसुलीचा राग मनात ठेवून सरपंच अनिल पाटील, संजय पाटील यांच्यासमक्ष जातीवाचक शिवीगाळ केली तसेच धक्काबुक्की करीत शासकीय कामात अडथळा आणला. या प्रकरणी ग्रामसेवक गौतम वाडे यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *