भुसावळ (प्रतिनिधी )-
साकेगाव येथील ४० वर्षीय दुग्ध व्यावसायीकाचा भुसावळातील जुना सातारा भागातील कोळी वाड्यात एका दुधग्राहकाने भर दिवसा डोक्यात सपासप रॉड मारल्याने खून झाल्याची घटना सोमवार दिनांक 2 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेेने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मामाजी टॉकीज रस्त्यावरील विशाल दुग्धालय या दूध डेअरी वरून गल्लोगल्ली दूध वाटप करणारा साकेगावचा युवक नसीर बशीर पटेल ( ४० हा संध्याकाळी कोळीवाड्यात दूध वाटपास गेला असता याचे डोक्यात संशयीत आरोपी धीरज गणेश शिंदे (२२ , जुना सातारा, भुसावळ) या ग्राहका तरूणाने नसीर पटेल यांच्या डोक्यात दोन-तीन वेळा लोखंडी राॅडने वार केल्यामुळे नसीर जागेवरच गतप्राण झाला.निर्घुणपणे झालेल्या खुनाचे नेमके कारण उशिरा पर्यंत कळू शकले नाही.मात्र सदर खून हा अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाल्याचे बोलले जात होते.
घटनेचे वृत्त कळताच घटनास्थळी डिवायएसपी गजानन राठोड , बाजारपेठ पो.नि.दिलीप भागवत, शहर पो स्टे चे संजय चौधरी, वाहतुक शाखेचे एपीआय के.टी.सुरळकार, तुषार पाटील व पोलिस कर्मचारी यांच्यासह यांच्यासह नगरसेवक गिरीश महाजन,सतीश सपकाळे, भिमराज कोळी, युवराज पाटील हे घटनास्थळी दाखल झाले होते .
घटना घडल्यानंतर ॲम्बुलन्स न आल्यामुळे मृत्यू देह घटनास्थळी एक तासापासून पडून होता . साधारण तासानंतर मृतदेह जळगाव येथे शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले.रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मयत नसीरच्या पश्चात पत्नी,२ मुले,२ मुली,वडील, भाऊ,बहीण असा परिवार आहे.



