भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील आठवडे बाजारात रविवारी बाजाराचा दिवस असल्याने तालुक्यातील लोक बाजारासाठी येतात. बाजारासाठी आलेल्या बारेला परिवारातील एक लहान मुलगी आपल्या आई-वडीलां सोबत बाजारात आली व हरविली.अकलुद गावातील महिलेला ती मिळून आल्याने त्या मुलीला बाजारपेठ पोलीस स्टेशनला आणले असता पोलिसांनी मुलीचा शोध दोन तासात लावून तिला आई-वडिलांच्या ताब्यात दिले. सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान भुसावळात आठवडे बाजारात बाजार करण्यासाठी तारसिंग बारेला हे पत्नी व मुलासोबत आले असता त्यांची ४ वर्षाची मुलगी आई-वडिलांची नजर चुकवून रजा टॉवर भागात फिरत-फिरत निघून गेली. ती फिरत असतांना सुमनबाई भगवान इंगळे रा.अकलुद ता. यावल यांना ती दिसली. त्या मुलीला बाजारपेठ पोलीस स्टेशनला आणले व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी भेट घेवून हरविलेल्या मुलीची माहिती दिली असता निरीक्षकांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचा-यांना मुलीच्या आई-वडिलांच्या शोधार्थ पाठविले असता शहर व बाजारातील परिसर पिंजून काढला व दोन तासानंतर डिस्को टॉवर भागात मुलीला घेऊन आले असता अचानक मुलीला तिचे आई-वडील बसलेले दिसले. यावेळी पोना.अनिल पाटील,पोकॉ.राहुल चौधरी, ईश्वर भालेराव, मपोकॉ. वैशाली सोनवणे, पोलीस मित्र जेरी फॅन्सीस डिसुजा यांनी मुलीला सुखरूप पालकांच्या ताब्यात दिले.



