मुक्ताइनगर –
श्रीस्कंदपुराणातील सोमेश्वर, श्रीसंत नामदेव महाराज यांच्या अभंगातील सोमेश्वर आणि श्रीक्षेत्र मेहूण तापीतीर येथील सोमेश्वर हा एकच आहे हे पटवून देण्यासाठी ऍडव्होकेट गोपाल दशरथ चौधरी (दाशरथी) यांनी असे सोमेश्वर पुरातन या ग्रंथाचे लेखन केले आहे. भगवान सोमेश्वराचे केलेले हे ऐतिहासिक संशोधन भाविक कथा अभ्यासकांसाठी निश्चितच लाभदायी ठरणार असल्याचे प्रतिपादन हभप लक्ष्मण महाराज चिखलीकर यांनी केले.
मुक्ताईनगर तालुक्यातील मेहूण-चिंचोल येथील श्रीयज्ञेश्वर आश्रमात संत मुक्ताई आरतीचे रचयिता व मेहूण येथील रहिवाशी ऍडव्होकेट गोपाल दशरथ चौधरी लिखित असे सोमेश्वर पुरातन ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी श्रीयज्ञेश्वर आश्रमाचे अध्यक्ष शारंगधर महाराज मेहूणकर तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अरूण पाटील, सौ. सुलोचनाबाई चौधरी, माजी प्राचार्य बी. आर. पाटील, त्र्यंबक महाराज, शिवासर उज्जैनकर उपस्थित होते. प्रारंभी अपघातात मरण पावलेल्या चिंचोल येथील रहिवाशांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनुपस्थित असलेल्या ऍडव्होकेट गोपाल चौधरी यांचे प्रास्ताविकपर मनोगत सुरेश बोरसे यांनी वाचून दाखवले. डॉ. जगदीश पाटील यांनी ग्रंथातील विषय प्रतिपादन केले. ग्रंथ प्रकाशकाची भूमिका निभावणाऱ्या हभप लक्ष्मण महाराज यांनी ग्रंथाचा आशय व लेखकाची भूमिका सविस्तर सांगून संत मुक्ताई गुप्तस्थळ पटवून देण्यासाठी ऍडव्होकेट चौधरी यांनी केलेल्या खटाटोपाचे वर्णन केले. सौ. सुलोचनाबाई चौधरी यांनी पती ऍडव्होकेट चौधरी यांचे लेखन व पतीच्या लेखनकार्यात दिलेली साथ याविषयी सांगितले. बी. आर. पाटील यांनी अध्यात्मिक ग्रंथाचे कौतुक केले. विश्वनाथ चौधरी बराणपूर यांनी मित्र ऍडव्होकेट चौधरी यांचे लेखन उत्कृष्ट प्रतीचे असल्याचे सांगितले. माजी आमदार अरूण पाटील यांनी वारकरी म्हणून ग्रंथ प्रकाशनाचा मान दिल्याबद्दल आभार मानून या ग्रंथामुळे धार्मिक ग्रंथसंपदेत खूप मोठी भर पडली असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. जगदीश पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी मेहूण सरपंच सुनील उर्फ राजू चौधरी, ऍडव्होकेट विजय महाजन, उमेश चौधरी, सौ. मालतीबाई पाटील, गं. भा. विद्याबाई चौधरी, संजय पाटील, वासुदेव महाराज, महादेव महाराज, विशाल महाराज, मंगेश महाराज, भूषण महाराज, अमितकुमार पाटील, संजय ताडेकर, अशोक तायडे, वसंत सोनवणे, राजेंद्र कोल्हे आदींनी परिश्रम घेतले.



