भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील महात्मा फुले नगरात घराबाहेर उभ्या असलेल्या दोन रीक्षांना अज्ञाताने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत सुमारे दोन ते तीन लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. मध्यरात्री आगीनंतर रहिवाशांनी धावपळ करीत आगीवर नियंत्रण मिळवले.
अज्ञातांनी पेटवल्या रीक्षा
मामाजी टॉकीज मागे महात्मा फुले नगरात दीपक पुंजू सोनवणे राहतात. बँजो वाजवून तसेच रीक्षा चालवून ते उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मालकिच्या दोन रीक्षा (क्रमांक एम.एच.19 सी.डब्ल्यू 0854 व एम.एच.19 व्ही.1793) असून सोमवारी मध्यरात्री अज्ञातांनी पेट्रोल टाकून या रीक्षांना पेटवून दिले. ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक नागरीकांनी पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळवले तर या घटनेत सुमारे दोन ते तीन लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.



