जळगाव शहरात माजी महापौरांच्या मुलाचा खून ;


जळगाव –
जळगाव शहराचे माजी महापौर अशोक सपकाळे यांचे चिरंजीव राकेश अशोक सपकाळे (28, शिवाजी नगर) यांचा जळगाव शहर पोलिस ठाणे हद्दीतील उस्मानिया पार्क जवळ अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्रांसह लोखंडी सळईने हल्ला चढवत खून केल्याची घटना बुधवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसलेतरी पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेने जळगावात मोठी खळबळ उडाली असून गुन्हेगारी पुन्हा चर्चेत आली आहे. दरम्यान, दोन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती आहे.
खून झाल्याची माहिती कळताच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह अन्य अधिकार्‍यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेत माहिती जाणून घेतली.
दोघे जखमी, एकाचा मृत्यू
माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मोठा मुलगा राजू उर्फ बाबा याचा गुरूवारी वाढदिवस असल्याने राकेश व सोनू या दोघा भावांसह चालक सलमान हे तिघे तयारी करून महागड्या दुचाकीने शिवाजी नगराकडे येत असताना हल्लेखोरांनी हल्ला चढवला. हल्ल्यात जबर जखमी झालेल्या राकेश सपकाळे यांना ओम क्रिटीकलमध्ये हलवले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. हल्लेखोरांच्या हल्ल्यात सोनूसह चालक सलमान हे जखमी झाले आहेत तर महागड्या दुचाकीची देखील तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *