भुसावळ (प्रतिनिधी)-
येथे रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी आणि एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोरोना भगाओ अभियानांतर्गत ‘कोरोना भगाओ ‘ या चित्ररथाचे गुरुवार ६ ऑगष्ट रोजी अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी आमदार संजय सावकारे,उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड,तहसीलदार दिपक धिवरे व बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोनि.दिलीप भागवत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. हा चित्ररथ दृकश्राव्य माध्यमातून साध्या सरळ भाषेत कोरोना पासून बचाव करणे, तसेच आजार झाल्यावर करायच्या उपाय योजना याबाबतीत भुसावळ व परिसरात फिरून जनतेला माहिती देणार आहे . रोटरी क्लबचे लोकोपयोगी उपक्रम कौतुकास पात्र आहेत व यापुढेही असेच उपक्रम कायम ठेवावेत असे गौरवोद्गार डिवायएसपी राठोड यांनी याप्रसंगी काढले, तर आमदार संजय सावकारे यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रशासनाला जनतेची साथ मिळाल्यास हा आजार लवकर आटोक्यात येईल, त्यासाठी रोटरीचा हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल अशी आशा व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनू मांडे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रोजेक्ट चेअरमन डॉ मकरंद चांदवडकर यांनी केले. या कार्यक्रमास रोटरी रेल सिटीचे अध्यक्ष संदीप जोशी,सचिव विशाल शाह,एचडीएफसी बँकेचे शाखा व्यवस्थापक विशाल कदम,रोटरी रेल सिटीचे सदस्य, एचडीएफसी बँकेचे कर्मचारी आदी उपस्थित होते.



