भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळातील आदर्श नगरसेवक पिंटू कोठारी यांच्या दातृत्वाचे कोठार कायमअडल्या-नडलेल्यांसाठी नेहमीच खुले असतात . याचा पुन्हा प्रत्यय भुसावलकरांना आला आहे . हतनूरच्या पॉझीटीव्ह परीवारातील दोन निगेटीव्ह मुलींना सांभाळण्याची जबाबदारी घेवून दातृत्वाचे दर्शन घडले आहे .
हतनूर, ता.भुसावळ येथील कॉरंटाईन असलेल्या 10 जणांच्या परीवारातील आठ सदस्य कोरोना पॉझीटीव्ह तर दोन लहान मुली निगेटीव्ह आल्यानंतर या मुलींचा दहा दिवस सांभाळ करण्यासाठी हतनूर गावातील आप्तेष्ट, भाऊबंदकी व मित्र परीवारानेही भीतीपोटी फारसा प्रतिसाद न दिल्याने नावाप्रमाणेच निर्मल असलेल्या कोठारी यांनी या मुलींना आपल्या घरी आणत त्यांचा पोटच्या मुलींप्रमाणे सांभाळ केला आहे व त्यांच्या सौभाग्यवती कविता कोठारी यांनीदेखील त्यांना तितकीच मोलाची साथ दिली आहे.
हतनूर, ता.भुसावळ येथील एका 70 वर्षीय महिला कोरोना पॉझीटीव्ह आढळली होती. यानंतर या परीवारातील 10 जणांना नवोदय विद्यालय कोविड केअर सेंटरमध्ये कॉरंटाइन करण्यात आले. यातील 8 व 10 वर्षाच्या दोन मुली निगेटिव्ह तर त्यांचे आई- वडीलांसह परीवारातील सर्वच सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आता या निगेटीव्ह अहवाल आलेल्या मुलींना 10 ते 12 दिवस कोठे ठेवावे, असा प्रश्न निर्माण झाला. मुलींच्या आई वडीलांनी गावातील मित्र, आप्तेष्ट व भाऊबंदकीच्या लोकांनाही फोन करुन मुलींना तुमच्या घरी आठ-दहा दिवस ठेवा, अशी विनवणी केली. यावर स्पष्टपणे नकार कोणी दिला नाही, पण बोलण्यातून थोड्याफार प्रमाणात नाराजीच दिसली. अखेर मुलींच्या वडीलांचे शहरातील तलाठी एम.एल. रत्नानी यांच्याशी मैत्रीचे संबंध असल्याने त्यांनी रत्नानींना मुलींच्या सांभाळण्याची जबाबदारी दिली मात्र रत्नानी यांचे केवळ दोन खोल्यांचे लहान घरात हा सांभाळ कठीण असल्याने त्यांनी नगरसेवक निर्मल कोठारींना मुलींच्या सांभाळण्याची विनंती केली. कोठारी यांनी क्षणाचाही विलंब न करता, या दोन्ही मुलींचा 16 जूलैपासून सांभाळ सुरू केला आहे. कोठारी दाम्पत्य हतनूर येथील दोन्ही मुलींना पोटच्या गोळ्याप्रमाणे वागवत आहे. मुलींचे जेवण, नास्ता कोठारी दाम्पत्यासोबतच होतो. कोरोनाच्या काळात निर्मल कोठारींनी शहरात न भुतो न भविष्यती सेवा दिली आहे.
कोठारींच्या निवासस्थानासमोरच बांधलेल्या नवीन घरात या देान्ही मुलींची व्यवस्था करण्यात आली. त्यांची करमणूक व्हावी म्हणून कोठारींनी त्याच दिवशी नवीन टिव्ही खरेदी करून बसवला. मुलींना अभ्यासासाठी वह्या, पुस्तके, खेळणी आणून देण्यात आली आहेत. दोन्ही मुलींची योग्य काळजी घेण्यासाठी एक स्वतंत्र महिलेसही कामावर ठेवले आहे. या मुलींसोबत जेवण करुन या मुलींना आई वडीलांची आठवण देखील येवू नये, असा प्रयत्न कोठारी दाम्पत्याचा आहे.
कोरोनाच्या पॉझीटीव्ह रुग्णांचाही तिरस्कार करू नका, त्यांना आपले पणाची वागणूक द्या, असे नगरसेवक पिंटू कोठारी म्हणाले. कोरोना निगेटीव्ह असलेल्या दोन्ही बालिकांचा सांभाळ करण्याची संधी मिळाली. या काळात कोणीही जी सेवा दिली ती करण्याचा प्रयत्न आहे. चार-पाच दिवसांतच हतनूरच्या या दोन्ही मुली आमच्या परिवाराच्या सदस्य बनल्या असल्याचे कोठारी म्हणाले.



