शिंदी येथील विठ्ठल मंदिरात महिनाभराच्या काकड आरतीची भक्तिमय वातावरणात सांगताटाळ-मृदंगाच्या गजरात भाविक तल्लीन; कार्तिकी पौर्णिमेला महापूजा, महाआरती व कीर्तनाचा कार्यक्रम

शिंदी, ता. भुसावळ (वार्ताहर) : टाळ-मृदंगाचा निनाद, अभंगांचे सूर आणि विठ्ठल नामाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात शिंदी येथील विठ्ठल मंदिरात महिनाभर चाललेल्या काकड आरतीची कार्तिकी पौर्णिमेला उत्साहात सांगता करण्यात आली. महिनाभर सुरू असलेल्या या धार्मिक उपक्रमाच्या समाप्तीप्रसंगी भाविक भक्त भावूक झाले होते.

कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू झालेल्या काकड आरतीचा समारोप कार्तिकी पौर्णिमेला करण्यात आला. यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी यांची महापूजा व महाआरती प्रमोद वायकोळे आणि सौ. प्रियंका वायकोळे या दांपत्याच्या हस्ते विधिवत करण्यात आली.

कार्तिक महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र व शुभ मानला जातो. या महिन्यात पूजा-अर्चा, नामस्मरण आणि भक्ती केल्याने जीवनात सुख-समृद्धी व समाधान लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेतून शिंदी गावात महिनाभर दररोज पहाटे काकड आरतीचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे गावातून दिंडी काढण्यात येत असे. ठिकठिकाणी महिलांकडून रांगोळ्या काढून सडा टाकण्यात येत होता. दिंडीतील भाविकांचे औक्षण करून स्वागत केले जात होते. तसेच अभंग व भक्तिगीतांच्या गायनाने संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मंदिरातील घंटानाद आणि विठ्ठल नामाचा जयघोष महिनाभर गावात घुमत होता.

कार्तिकी पौर्णिमेला सांगतेनिमित्त संपूर्ण गावातून मोठ्या भक्तिभावाने दिंडी काढण्यात आली. त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा व महाआरती पार पडली. यावेळी महिला व पुरुष भाविकांनी भक्तिगीते आणि अभंगांचे गायन करीत पावल्या खेळल्या. लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांनीच या धार्मिक सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ह.भ.प. सुभाष महाराज भालोदकर यांचे कीर्तन संपन्न झाले. आपल्या कीर्तनातून त्यांनी जीवनात कधीही देवाचा विसर पडू देऊ नका, धनसंपत्तीच्या मोहात न अडकता निरंतर नामस्मरण करावे. देवभक्ती हाच जीवनाचा खरा श्वास आहे, असे मार्गदर्शन केले.

'देवा, तुझा विसर पडू देऊ नको' आणि 'हेचि दान देगा देवा' या अभंगांच्या माध्यमातून महाराजांनी भक्ती, श्रद्धा आणि नामस्मरणाचे महत्त्व विशद केले. यावेळी उपस्थित भाविक अभंगांच्या स्वरांत, टाळ-मृदंगांच्या निनादात आणि विठ्ठल नामस्मरणात तल्लीन झाले होते.

महिनाभर चाललेल्या या काकड आरतीच्या धार्मिक उपक्रमामुळे गावात एकात्मता, भक्तिभाव आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महिला व पुरुष भजनी मंडळांसह गावातील भाविक भक्तांनी विशेष सहकार्य केले.