जळगाव (प्रतिनिधी) - जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीच्या सुशोभीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतर या चौफुलीला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्वरूप देण्याच्या दृष्टीने अजिंठा हाउसिंग सोसायटीतर्फे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संकल्पचित्रासह यासंदर्भातील निवेदन उपमहापौर मनोज चौधरी यांना सादर करण्यात आले. या मागण्यांना उपमहापौरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अजिंठा चौफुलीच्या सर्कलमध्ये पद्मपाणी बुद्ध यांची मूर्ती बसविणे, रस्त्यावर अजिंठा गेटची प्रतिकृती उभारणे, सर्कलवर अजिंठा लेणीतील निवडक भित्तिचित्रे साकार करणे, तसेच आकाशवाणी चौक, जुना नेरी नाका आणि हॉटेल कमल पॅराडाईस येथून अजिंठा चौफुलीला जोडणाऱ्या रस्त्यांवर अजिंठा लेणीविषयी माहिती देणारे लोखंडी फलक लावणे, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या संकल्पनेविषयी माहिती देताना ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांनी सांगितले की, जळगाव शहराची ओळख 'सुवर्णनगरी' (गोल्ड सिटी) आणि 'केळीचे शहर' (बनाना सिटी) अशी आहे. त्याचप्रमाणे जळगावला 'अजिंठा लेणीचे प्रवेशद्वार' म्हणूनही ओळखले जाते. शहरापासून अवघ्या ४९ किलोमीटर अंतरावर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी असल्याने या ऐतिहासिक वारशाची ओळख शहरात ठळकपणे निर्माण होणे आवश्यक आहे. अजिंठा चौफुलीवर अजिंठा लेणीची प्रतिकृती असलेले प्रवेशद्वार, ऐतिहासिक भित्तिचित्रे आणि पद्मपाणी बुद्ध मूर्ती साकारल्यास या चौफुलीला वेगळे वैभव प्राप्त होईल. तसेच अजिंठा लेणीची माहिती देणारे फलक उभारल्यास पर्यटक आणि नागरिकांना या जागतिक वारशाची माहिती मिळण्यास मदत होईल. त्यामुळे अजिंठा चौक हे जळगाव शहरातील एक आकर्षक आणि प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसित होऊ शकते. यामुळे शहराच्या सौंदर्यातही भर पडेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. जयसिंग वाघ यांनी सादर केलेले संकल्पचित्र पाहून उपमहापौर मनोज चौधरी यांनी या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. या विषयावर लवकरच महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. तसेच या बैठकीस संबंधित संकल्पना मांडणाऱ्या प्रतिनिधींनाही निमंत्रित केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ, अजिंठा हाउसिंग सोसायटीचे चेअरमन दिलीप सपकाळे, ॲड. आनंद कोचुरे, दिलीप तासखेडकर, अशोक सैंदाणे, नथू अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. अजिंठा लेणीच्या ऐतिहासिक आणि कलात्मक वारशाची ओळख जळगाव शहराच्या प्रवेशद्वारावरच निर्माण करण्याची ही संकल्पना प्रत्यक्षात आल्यास अजिंठा चौफुली शहराच्या सौंदर्यात भर घालणारे महत्त्वाचे आकर्षण ठरू शकते.



