सक्षम नारी फाउंडेशनच्या सख्यांनी दुर्गम टेंबुरबारा पाड्यावर साजरी केली माणुसकीची दिवाळी!आदिवासी भगिनींना साड्यांचे, बालकांना स्वेटर्सचे वाटप; फराळाच्या माध्यमातून आनंदाची दिवाळी

भुसावळ (प्रतिनिधी) – दिवाळी म्हटली की नवीन कपड्यांची खरेदी, घराघरांत दरवळणारा फराळाचा खमंग सुवास आणि आनंदाचे वातावरण डोळ्यांसमोर येते. मात्र, समाजातील वंचित घटकांच्या जीवनातही दिवाळीचा आनंद फुलावा,दिवाळीचा खरा आनंद केवळ स्वतःच्या घरात दिवे लावण्यात नसून, दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्यात आहे, हा उद्देश समोर ठेवून या उपक्रमातून   दुर्गम भागातील आदिवासी पाड्यावर जाऊन आदिवासी भगिनी आणि बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत सक्षम नारी फाउंडेशनच्या सख्यांनी माणुसकीची दिवाळी साजरी केली.

   दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी वंचित घटकांसोबत साजरी करण्याचे फाउंडेशनच्या सदस्यांनी ठरविले. जवळच्या परिसरात अनेक सामाजिक संस्था मदतकार्य करतात, त्यामुळे यंदा खऱ्या अर्थाने मदतीची गरज असलेल्या दुर्गम भागातील आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार भुसावळपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या दुर्गम टेंबुरबारा या पाड्याची निवड करण्यात आली.

कच्च्या मातीचे आणि वळणावळणाचे खडतर रस्ते पार करत सुमारे दोन तासांचा प्रवास करून फाउंडेशनच्या सख्या टेंबुरबारा येथे पोहोचल्या. तेथील आदिवासी भगिनींना नवीन साड्यांचे वाटप करण्यात आले, तर थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी लहान मुलांना स्वेटर्स देण्यात आले. यासोबतच सर्वांना दिवाळीचा फराळ वाटप करून सणाचा आनंद द्विगुणित करण्यात आला. वंदना कांबळे यांनी लहान मुलांना चॉकलेट व बिस्किटांचे वाटप केले.

या उपक्रमासाठी १०० साड्या सौ. सुनंदा डांगे आणि श्री. पांचाल यांनी उपलब्ध करून दिल्या. तसेच स्वेटर्स खरेदीसाठी सक्षम नारी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा गाडेकर, अनघा काळे, संगीता नायर, पारूल वर्मा आणि विदुला भोळे यांनी आर्थिक सहकार्य केले. फाउंडेशनतर्फे यावेळी २२ किलो चिवडा आणि १२ किलो मोतीचूर लाडूंचे वाटप करण्यात आले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सक्षम नारी फाउंडेशनच्या संगीता जगताप, सुनीता जोशी, सुनंदा डांगे, शीतल मोरे, गायत्री विसपुते, संघमित्रा ठाकणे, वंदना कांबळे, डॉ. वैशाली रामवंशी, शीतल भालेराव आणि डॉ. सुवर्णा गाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या समन्वयक म्हणून अॅड. जास्वंदी भंडारी यांनी सहकार्य केले.