भुसावळ (प्रतिनिधी)- यंदा सर्वदूर दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, शेतीत पीक नाही, जनावरांना चारा नाही आणि पिण्यासाठी पाण्याचीही टंचाई जाणवत आहे. निसर्गाचे संतुलन बिघडण्यामागे देशी वृक्षांची घट, जलप्रदूषण, वायुप्रदूषण, ध्वनीप्रदूषण तसेच विघटन न होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचा वाढता वापर ही प्रमुख कारणे आहेत. नैसर्गिकरीत्या जमिनीत पाणी मुरविण्यास आणि वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण टिकविण्यास देशी वृक्षांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. मात्र, अशा दीर्घायुषी वृक्षांची संख्या कमी होत असल्याने पर्यावरणापुढील आव्हाने वाढत आहेत. दुष्काळाच्या संकटातून निसर्गाने आपल्याला पर्यावरणाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. धनसंपत्तीबरोबरच सुख, समृद्धी आणि निरोगी आयुष्यही प्रत्येकाला हवे असते. त्यामुळे लक्ष्मीपूजन करताना निसर्ग संवर्धनाचाही संकल्प करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी केले. प्रत्येकाने यंदाच्या दिवाळीत सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळणे, खासगी वाहनांऐवजी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, कर्कश आवाज करणाऱ्या फटाक्यांमुळे होणारे ध्वनीप्रदूषण टाळणे आणि पाण्याचा वापर काटकसरीने करणे, अशा पर्यावरणपूरक सवयी अंगीकाराव्यात. तसेच आपल्या शेतात, घरासमोर किंवा परिसरात उपलब्ध असलेल्या जागेत दीर्घकाळ टिकणाऱ्या, जमिनीत खोलवर पाणी मुरविण्यास मदत करणाऱ्या देशी वृक्षांची संगोपनासहित मोठ्या प्रमाणात लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड माँ के नाम अभियान 3’ मध्ये प्रत्येकाने सहभागी होऊन वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाला प्राधान्य द्यावे. केवळ वृक्ष लावणे नव्हे, तर त्यांचे योग्य संगोपन करून ते जगविण्याची जबाबदारीही स्वीकारावी. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून, प्रत्येकाने पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारल्यास दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त आणि हरित भारत घडविण्यास निश्चितच हातभार लागेल, असेही डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी सांगितले.



