कापूस आयात शुल्क परिपत्रकाची भुसावळात जाहीर होळी; क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक!

भुसावळ (प्रतिनिधी)-
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारच्या कापूस आयात शुल्काच्या अन्यायकारक परिपत्रकाविरोधात शुक्रवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी भुसावळ तालुक्यातील महादेव माळ येथे तीव्र संताप व्यक्त करत, या परिपत्रकाची जाहीर होळी करण्यात आली. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत  तुपकर, प्रदेशाध्यक्ष राजीव  कसबे आणि महिला प्रदेशाध्यक्ष चैत्रालीताई शेलार यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारच्या या धोरणामुळे देशांतर्गत कापसाचे भाव पाडण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व व नियोजन रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष दिलीप चौधरी साहेब यांनी केले. याप्रसंगी जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख देवेंद्र वराडे (अप्पा), भुसावळ तालुकाध्यक्ष अतुल पाटील, सहसचिव रमेश जाधव, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष वैभव पाटील, पंडित जाधव, बाळू तंवर, कसनदास जाधव यांच्यासह स्थानिक शेतकरी व शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारने कापूस आयातीला प्रोत्साहन देणारे हे परिपत्रक तात्काळ मागे घेतले नाही, तर आगामी काळात रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र व व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा संपर्क प्रमुख देवेंद्र वराडे आणि रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष दिलीप चौधरी, भुसावळ तालुकाध्यक्ष अतुल पाटील यांनी यावेळी दिला.