भुसावळ (प्रतिनिधी) : यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. भुसावळ तालुका दुष्काळ ग्रस्त तालुका जाहीर झाला आहे अशा परिस्थितीत समाजातील गरजू, गरीब आणि कष्टकरी बांधवांच्या जीवनात दिवाळीचा आनंद निर्माण व्हावा, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलावे आणि सणाचा गोडवा प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचावा, या सामाजिक भावनेतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अनोखा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. कट्टर शिवसैनिक उमाकांत शर्मा (नमा) यांच्या संकल्पनेतून 'एक हात मदतीचा' हा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत भुसावळ तालुक्यातील भीलमडी आणि मांडवादिगर या गावांची निवड करण्यात आली. या दोन्ही गावांमधील गरीब, कष्टकरी शेतकरी आणि शेतमजुरांच्या घरी तसेच शेताच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन त्यांना दिवाळीचा फराळ, मिठाईचा गोडवा आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले. दिवाळी हा केवळ दिव्यांचा आणि रोषणाईचा सण नसून, तो प्रेम, माणुसकी, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा उत्सव आहे. याच भावनेतून शिवसैनिकांनी गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचत त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा केला. शेतात राबणाऱ्या कष्टकरी बांधवांच्या बांधावर जाऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छांसह फराळ व कपडे देण्यात आल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून आले. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आणि शेतमजूर बांधवांना आधार देण्याचा छोटासा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. केवळ उत्सव साजरा न करता समाजातील गरजू घटकांसोबत आनंद वाटून घेणे, हीच खरी दिवाळी असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या सामाजिक उपक्रमात ज्येष्ठ शिवसैनिक तथा रेल कामगार सेना मंडळ अध्यक्ष ललित मुथा, माजी शहरप्रमुख व नगरसेवक मुकेश गुंजाळ, शिवसेना शहरप्रमुख गणेश चौधरी, शिवसेना उपशहरप्रमुख राकेश खरारे, शिवसैनिक ॲड. मिलिंद कापडे, शिवसैनिक मंगेश धुमाळ तसेच मित्र तुळशीराम पवार आदी उपस्थित होते. गरजूंच्या घरात आनंदाचा दिवा पेटविणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे, हाच या उपक्रमाचा खरा उद्देश असून, माणुसकीच्या नात्याने साजरी केलेली ही दिवाळी स्व बाबासाहेबांच्या ८०टक्के समाजकारण व २०टक्के राजकारण या धोरणानुसार सामाजिक बांधिलकीचा सुंदर आदर्श ठरली.


