इनरव्हील क्लब भुसावळतर्फे कन्या पूजन; बालसंस्कार शिबिरातून संस्कारांची शिकवण ; नवदुर्गांच्या गुणांचा अंगीकार करून सुंदर व्यक्तिमत्त्व घडविण्याचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी)       क्लब भुसावळतर्फे १८ ऑक्टोबर २०२६ रोजी गणपती मंदिर, देना नगर येथे बालसंस्कार शिबिरांतर्गत कन्या पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अष्टमीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून मुलींना भारतीय संस्कृती, नवरात्रोत्सवाचे महत्त्व आणि संस्कारांची शिकवण देण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रारंभी क्लबच्या अध्यक्षा सविता शुक्ला यांनी सनातन हिंदू संस्कृतीतील नवरात्रोत्सवाचे महत्त्व विशद केले.

त्यानंतर आयएसओ संगीता जाधवानी यांनी नऊ देवींची माहिती देत त्यांच्या विविध गुणांचे महत्त्व सांगितले. यावेळी मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. मुलांनीही प्रश्नांची उत्तरे देत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यानंतर उपस्थित कन्यांचे हळदी-कुंकू करून त्यांना प्रसाद आणि विविध भेटवस्तू देण्यात आल्या. नऊ देवींच्या रूपातून करुणा, ममता, साहस आणि क्षमा यांसारखे गुण शिकायला मिळतात.

हे गुण आपल्या जीवनात अंगीकारून चांगल्या सवयी लावाव्यात, जीवनात प्रगती करावी आणि सुंदर व्यक्तिमत्त्व घडवावे, असे आवाहन संगीता जाधवानी यांनी मुलींना केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन क्लबच्या अ‍ॅडव्हायजरी सदस्य कमल सचदेव यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी क्लबच्या अध्यक्षा सविता शुक्ला, अ‍ॅडव्हायजरी सदस्य कमल सचदेव, माजी अध्यक्षा किरण शुक्ला आणि आयएसओ संगीता जाधवानी उपस्थित होत्या.गणपती मंदिरात अष्टमीच्या दिवशी आयोजित या उपक्रमातून बालसंस्कारांना प्रोत्साहन मिळण्यासोबतच महिला सक्षमीकरणाचा संदेशही देण्यात आला.