धम्मचक्र प्रवर्तन दिन २०२६ निमित्त मध्य रेल्वेची व्यापक तयारी; नागपूर आणि अजनी स्थानकांवर अडीच लाख अतिरिक्त प्रवाशांची अपेक्षा


२६ विशेष गाड्या, शटल बस सेवा, प्रवासी प्रतीक्षा क्षेत्रे (होल्डिंग एरिया), दीक्षाभूमीवर विशेष प्रवासी सहाय्यता केंद्र, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेत वाढ

   भुसावळ (प्रतिनिधी)-धम्मचक्र प्रवर्तन दिन २०२६ च्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने दिनांक १९ ते २२ ऑक्टोबर २०२६ या चार दिवसांच्या कालावधीत नागपूरला भेट देणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी नागपूर आणि अजनी रेल्वे स्थानकांवर व्यापक व्यवस्था केली आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने २६ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. याव्यतिरिक्त, कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी १९ ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत १४ गाड्यांना अजनी स्थानकावर तात्पुरता थांबा देण्यात आला आहे.
या कालावधीत नागपूर आणि अजनी स्थानकांवर सुमारे अडीच लाख अतिरिक्त प्रवासी येण्याची शक्यता आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी गर्दीचे नियोजन, तिकीट व्यवस्था, प्रवासी सहाय्यता, वैद्यकीय सेवा, स्वच्छता आणि सुरक्षा यांसारख्या विशेष व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी खालील उपाययोजना करण्यात आल्या आहेत:

*प्रवाशांसाठी अतिरिक्त प्रतीक्षा क्षेत्रे (होल्डिंग एरिया)*
रेल्वे स्थानकांवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि प्रवाशांची ये-जा सुव्यवस्थित ठेवण्यासाठी, नागपूर स्थानकाच्या पूर्व बाजूला संत्रा मार्केट परिसरात एक प्रतीक्षा क्षेत्र (होल्डिंग एरिया) तयार करण्यात येत आहे. तसेच, अजनी स्थानकावरील पार्किंग क्षेत्रातही एक अतिरिक्त प्रतीक्षा क्षेत्र उपलब्ध करून दिले जाईल. या दोन्ही ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी प्रकाश व्यवस्था, पंखे, फिरती प्रसाधनगृहे (मोबाईल टॉयलेट्स) आणि बसण्याची व्यवस्था असेल.
गर्दीच्या नियोजनासाठी, या कालावधीत नागपूर आणि अजनी या दोन्ही स्थानकांवरील कार पार्किंग सुविधा पूर्णपणे बंद राहतील. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे आणि स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी.

*अतिरिक्त तिकीट सुविधा आणि दीक्षाभूमीवर प्रवासी सहाय्यता केंद्र*
तिकीट खरेदी सुलभ करण्यासाठी आणि बुकिंग खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी, नागपूर स्थानकावर पाच अतिरिक्त 'मोबाईल अनरिझर्व्हड तिकीटिंग सिस्टम' सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. नागपूर आणि अजनी स्थानकांवरील प्रतीक्षा क्षेत्रांमध्येही 'मोबाईल अनरिझर्व्हड तिकीटिंग सिस्टम' सुविधा उपलब्ध असतील. प्रवाशांना मदत करण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त तिकीट तपासणी कर्मचारी तैनात केले जातील. 
याव्यतिरिक्त, भाविकांच्या सोयीसाठी दीक्षाभूमी परिसरात एक विशेष 'प्रवासी सहाय्यता केंद्र' स्थापन करण्यात आले आहे. हे केंद्र विशेष गाड्यांविषयी माहिती देईल आणि प्रवाशांना तिकीट मिळवून देण्यात मदत करेल. भाविकांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन सोयीस्करपणे करता यावे, यासाठी विशेष गाड्यांचे वेळापत्रकही या केंद्रावर ठळकपणे प्रदर्शित केले जाईल.

*प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी*
गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि प्रवाशांची ये-जा सुरळीत राहावी, यासाठी नागपूर आणि अजनी स्थानकांवर दिनांक १९ ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री बंद राहील.

*प्रवासी सहाय्यता आणि वैद्यकीय सुविधा*
प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि आवश्यक माहिती पुरवण्यासाठी नागपूर स्थानकाच्या दोन्ही बाजूंना तसेच अजनी स्थानकावर 'मे आय हेल्प यू' बूथ उभारले जातील. कोणत्याही वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी मदत मिळण्यासाठी दोन्ही स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय सुविधा आणि रुग्णवाहिका उपलब्ध असतील.
या कार्यक्रमादरम्यान प्रवाशांना दिलासा मिळावा आणि सोय व्हावी, यासाठी स्थानकांवर शुद्ध पिण्याच्या पाण्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित केली जाईल; तसेच थंड पिण्याच्या पाण्याची अतिरिक्त सोयही केली जाईल.

*स्वच्छता, सुरक्षा आणि देखरेखीमध्ये वाढ*
प्रलंबित बाबींच्या निपटारासाठीच्या विशेष मोहिमेचा (SCDPM-6) भाग म्हणून, स्वच्छता राखण्याबाबत जनजगृती निर्माण करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या गेल्या आहेत. 
स्थानके आणि गर्दी जमण्याची ठिकाणे (होल्डिंग एरिया) स्वच्छ ठेवण्यासाठी अतिरिक्त स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या अतिरिक्त जवानांची तैनाती केली जाईल. सुरक्षेवर अधिक बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील.
प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्था कायम राखण्यासाठी आरपीएफ आणि शासकीय  रेल्वे पोलीस २४ तास गस्त घालतील. नागपूर विभागाचे अधिकारीही या सर्व व्यवस्थांवर सतत देखरेख ठेवतील आणि काही समस्या उद्भवल्यास त्या त्वरित सोडवण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधतील.

*व्यापक प्रसिद्धी आणि प्रवासी मार्गदर्शन*
विशेष गाड्यांच्या वेळा, थांबे, कामकाजात होणारे बदल आणि प्रवासावरील निर्बंधांबाबत प्रवाशांना माहिती मिळावी, यासाठी नागपूर शहरात विविध महत्त्वाच्या ठिकाणी १०० हून अधिक बॅनर आणि २५ मोठी होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत. या प्रसिद्धी उपक्रमांचा उद्देश प्रवाशांना वेळेवर माहिती देणे आणि भाविकांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन प्रभावीपणे करण्यास मदत करणे हा आहे. 

मध्य रेल्वेचा नागपूर विभाग 'धम्मचक्र प्रवर्तन दिन २०२६' दरम्यान सुरक्षित, सोयीस्कर आणि कार्यक्षम प्रवासी सेवा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहे. प्रवाशांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या प्रवासाचे नियोजन आगाऊ करावे, विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच, स्थानकांवर आणि प्रवासी प्रतीक्षा क्षेत्रांमध्ये शिस्तबद्ध हालचाल राखावी आणि प्रवाशांची ये-जा सुरळीत पार पडण्यासाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.

प्रवाशांना विनंती आहे की, त्यांनी आपला प्रवास सुरू करण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत चौकशी माध्यमांद्वारे आणि रेल्वेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरून रेल्वेच्या वेळा, थांबे आणि आरक्षणाबाबतची माहिती तपासून घ्यावी