भुसावळ (प्रतिनिधी) : टीईटीसंदर्भातील छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या अलीकडील निर्णयामुळे चिंतेत असलेल्या शिक्षकांच्या पुढील न्यायालयीन लढ्याची दिशा ठरविण्यासाठी भुसावळ येथे शिक्षकांची महत्त्वपूर्ण सभा उत्साहात संपन्न झाली. येथील माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात शिक्षणतज्ज्ञ प्रा. ह. दलाल यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली ही सभा आयोजित करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका (SLP) दाखल करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाहीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. टीईटीसंदर्भातील न्यायालयीन निर्णयामुळे राज्यातील सुमारे आठ हजार शिक्षक चिंतेत असल्याचे सभेत नमूद करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पुढील कायदेशीर पर्याय समजून घेणे आणि सामूहिकरीत्या न्यायालयीन लढा देण्याची भूमिका निश्चित करणे, हा सभेचा प्रमुख उद्देश होता. जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांचा मोठा सहभाग या सभेला जळगाव जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यांमधून शिक्षक आणि शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक शिक्षकांनी सुटी घेऊन सभेला हजेरी लावली. टीईटीसंदर्भातील प्रश्नावर एकत्रितपणे मार्ग काढण्याची भूमिका उपस्थित शिक्षकांनी मांडली. प्रा. ह. दलाल यांचे दीड तास मार्गदर्शन सभेत प्रा. ह. दलाल यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या निर्णयाचे सविस्तर विश्लेषण केले. पुढील काळात कोणती पावले उचलावीत, सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची प्रक्रिया कशी असू शकते आणि त्यासाठी कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत, याबाबत त्यांनी विविध न्यायालयीन निवाड्यांचा संदर्भ देत सुमारे दीड तास मार्गदर्शन केले. मार्गदर्शनानंतर उपस्थित शिक्षकांनी विविध शंका आणि प्रश्न उपस्थित केले. प्रा. दलाल यांनी त्यांचे निरसन करून पुढील कायदेशीर प्रक्रियेबाबत माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयात एकत्रितपणे जाण्याचा निर्धार सभेच्या अखेरीस उपस्थित शिक्षकांनी प्रा. ह. दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला. या कायदेशीर लढ्यासाठी समन्वयाने पुढील कार्यवाही करण्यावरही चर्चा झाली. बीड, छत्रपती संभाजीनगर तसेच विदर्भातील काही शिक्षकांनीही या समूहात सहभागी होण्याची तयारी दूरध्वनीद्वारे कळविल्याची माहिती सभेत देण्यात आली. त्यामुळे या विषयावर विविध भागांतील शिक्षकांना एकत्र आणून पुढील दिशा ठरविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट झाले. मान्यवरांची उपस्थिती सभेचे प्रास्ताविक रावेर तालुक्यातील प्रवीण धुंडले यांनी केले. व्यासपीठावर लोखंडे सर, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक व शिक्षक समन्वय समितीचे नेते तुळशीराम सोनवणे, पी. जे. पाटील, गौरव भोळे, जामनेर येथील एजाज सर, सौ. मनिषा पायघन, सौ. बोरोले, डोळे सर आदी उपस्थित होते. टीईटीसंदर्भातील न्यायालयीन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा करून पुढील कायदेशीर मार्ग निश्चित करण्याच्या दृष्टीने ही सभा महत्त्वपूर्ण ठरली.


