भुसावळमध्ये बुरखाधारी महिलेने लांबवले तीन लाखांचे सोन्याचे दागिने!

 भुसावळ (प्रतिनिधी) - शहरातील सराफा बाजारपेठेत बुरखाधारी महिलेने सुमारे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून बाजारपेठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
, शहरातील सराफा पेठेतील राजेश बालमुकुंद अग्रवाल यांच्या दुकानात ९ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास बुरखा परिधान केलेली महिला आली. तिने दुकानातील कर्मचाऱ्यांकडे सोन्याचे दागिने पाहण्याची मागणी केली. त्यानुसार दुकानदाराने तिला विविध प्रकारचे दागिने दाखवण्यास सुरुवात केली.

दागिने पाहत असताना संबंधित महिलेने दुकानदाराचे लक्ष विचलित केले. याच संधीचा फायदा घेत तिने सुमारे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आणि दुकानातून निघून गेली. काही वेळानंतर दागिने कमी असल्याचे दुकानदाराच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला , मात्र संबंधित महिला आढळून आली नाही.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर सराफा व्यावसायिकांनी बाजारपेठ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास

पोलिसांकडून दुकानातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. संबंधित महिलेची ओळख पटविणे, ती कोणत्या दिशेने गेली आणि तिचा ठावठिकाणा शोधणे, या दृष्टीने तपास सुरू आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, सराफा व्यावसायिकांनी दुकानात दागिने दाखवताना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.