समाजसेवा, अध्यात्म आणि संस्कृतीतील योगदानाची दखल; भुसावळातील रामचंद्र ढाके यांना ‘सरदार वल्लभभाई पटेल हिंदुरत्न’ पुरस्कार २०२६ जाहीर ;

४५ वर्षांपासून धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात अविरत सेवा; ३१ ऑक्टोबर रोजी पुण्यात होणार पुरस्कार प्रदान ; 
 भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील हनुमान नगर येथील श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष रामचंद्र पांडुरंग ढाके (वय ८५) यांना समाजसेवा, अध्यात्म आणि संस्कृती क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘सरदार वल्लभभाई पटेल हिंदुरत्न पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. पुणे येथील डॉ. मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट यांच्या वतीने तसेच संबंधित संस्थांच्या सहकार्याने हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे पत्र ढाके यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.

ढाके यांनी गेल्या ४५ वर्षांपासून भुसावळमधील हनुमान नगर परिसरात हनुमान मंदिर आणि श्रीराम मंदिर संस्थानच्या माध्यमातून धार्मिक व आध्यात्मिक कार्याचा सातत्याने प्रसार केला आहे. वारकरी भजनी मंडळ, हरिनाम सप्ताह, विविध धार्मिक ग्रंथांची पारायणे, कीर्तन, प्रवचन आणि निरूपण अशा उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजात धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा जपण्याचे कार्य केले आहे.

‘सेवा हीच खरी पूजा’ या भावनेतून कार्य

सेवा हीच खरी पूजा या भावनेतून ढाके यांनी अनेक वर्षे धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे. त्यांच्या या दीर्घकालीन सेवाकार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरव

या पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे आहे. पुरस्कार जाहीर झाल्याने भुसावळमधील हनुमान नगर परिसरासह विविध स्तरांतून रामचंद्र पांडुरंग ढाके यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या दीर्घकालीन सेवाकार्याचे कौतुक केले जात आहे.