भुसावळ (प्रतिनिधी)- डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय दुहेरी यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचे तुरा रोवला आहे. इयत्ता दहावीचा विद्यार्थी आदित्य राजेंद्र सोनवणे याची राष्ट्रीय रायफल शूटिंग चॅम्पियनशिप २०२६ साठी निवड झाली असून, शाळेच्या १७ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघाने तालुकास्तरीय आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. या दुहेरी यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत मानाची भर पडली आहे.भोपाळ (मध्य प्रदेश) येथे आयोजित राष्ट्रीय रायफल शूटिंग निवड चाचणीत आदित्य सोनवणे याने ४०० पैकी ३९४.७ गुण मिळवत उत्कृष्ट नेमबाजीचे प्रदर्शन केले. अचूकता, एकाग्रता, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर त्याने ही उल्लेखनीय कामगिरी केली. सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत आणि जिद्दीच्या बळावर त्याने राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धेत स्थान मिळवले आहे. राष्ट्रीय रायफल शूटिंग चॅम्पियनशिप २०२६ ही स्पर्धा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे. आदित्यच्या या यशामुळे शाळेसह भुसावळ शहराचा गौरव वाढला आहे.दरम्यान, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी भुसावळ येथील बियाणी मिलिटरी स्कूलच्या मैदानावर आयोजित तालुकास्तरीय आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावले. संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक समन्वय, जिद्द, चिकाटी आणि खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. या विजयामुळे संघाने जळगाव येथे होणार्या जिल्हास्तरीय आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांनी आदित्य सोनवणे आणि क्रिकेट संघाचे अभिनंदन केले. आगामी राष्ट्रीय रायफल शूटिंग चॅम्पियनशिप तसेच जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांच्या या दुहेरी क्रीडा यशामुळे शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेचीही प्रभावी ओळख निर्माण झाली आहे.


