भुसावळ ( प्रतिनिधी )- महावितरणकडून भुसावळ शहरासह ग्रामीण भागात वीज मीटर तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. विभागात मोठ्या प्रमाणात वीज गळती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणने कारवाई सुरू केली आहे. वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध विद्युत कायदा २००३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. शिंदी वितरण केंद्रांतर्गत मोंढाळे, खंडाळे व शिंदी या गावांमध्ये अभियंता शैलेश आखरे आणि भुसावळ ग्रामीण उपविभागाच्या पथकाने सप्टेंबर महिन्यात एकूण १० जणांविरुद्ध वीजचोरीप्रकरणी कारवाई केली. संबंधित ग्राहकांना दंडाची बिले देण्यात आली असून, नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. दंड व तडजोड रक्कम न भरल्यास गुन्हा दाखल अभियंता शैलेश आखरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ अंतर्गत वीजचोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर संबंधित ग्राहकाने नियमानुसार दंडाची रक्कम व तडजोड रक्कम भरल्यास, लागू तरतुदींनुसार तडजोडीची प्रक्रिया होऊ शकते. मात्र, निर्धारित वेळेत दंड व तडजोड रक्कम न भरल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येते. तसेच महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने गुन्ह्यांची नोंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्मार्ट मीटरशी छेडछाड करू नका ग्राहकांनी नियमानुसार वीज वापरावी आणि अधिकृत वीजमीटरद्वारेच वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. नवीन मीटरसाठी मागणी करणाऱ्या ग्राहकांना तात्काळ मीटर उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जात आहे. स्मार्ट मीटरच्या तपासणीवरही विशेष लक्ष देण्यात येत असल्याने कोणत्याही ग्राहकाने स्मार्ट मीटरशी छेडछाड करू नये, असे आवाहन अभियंता शैलेश आखरे यांनी केले आहे. वीजचोरीची माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय वीजचोरीमुळे महावितरणचे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच वीज वितरण व्यवस्थेवरही परिणाम होतो. त्यामुळे वीजचोरीला आळा घालण्यासाठी मीटर तपासणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. वीजचोरीसंदर्भात माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्यात येत असल्याचेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वीजचोरी टाळून अधिकृत पद्धतीने वीज वापरावी आणि महावितरणच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


