भुसावळ (प्रतिनिधी) : कुऱ्हा पानाचे येथील स्वस्त धान्य दुकानात गेल्या दोन महिन्यांपासून धान्य मिळत नसल्याच्या तक्रारीमुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. याबाबत नागरिकांनी सामूहिकरित्या तक्रार केल्यानंतर प्रशासनाने दखल घेतली. सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी पुरवठा अधिकारी रेवतकर मॅडम यांनी प्रत्यक्ष रेशन दुकानाला भेट देऊन नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी रेशन दुकानातील धान्यवाटपाबाबत विविध तक्रारी मांडल्या. धान्य घेण्यासाठी महिला व वृद्ध नागरिकांना उन्हात तासनतास उभे राहावे लागते, धान्यवाटपाच्या वेळी नागरिकांकडून १० ते २० रुपये घेतले जातात, ई-पॉस मशीनची पावती न देता हाताने लिहिलेल्या चिठ्ठ्या दिल्या जातात, तसेच नियमानुसार ३५ किलो धान्य मिळण्याऐवजी कमी धान्य दिले जाते, असे आरोप नागरिकांनी यावेळी केले. या संदर्भात नागरिकांनी तहसीलदारांकडे लेखी तक्रार केली होती. त्याची दखल घेत पुरवठा अधिकारी रेवतकर यांनी गावात येऊन नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी नागरिकांच्या तक्रारी शांतपणे ऐकून घेत संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. प्रशासनाच्या या प्रत्यक्ष भेटीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, रेशन दुकानातील धान्यवाटप प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी, पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार पूर्ण धान्य मिळावे आणि तक्रारींचे कायमस्वरूपी निराकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी श्रीकांत बरकले, योगेश पाटील, अतुल पाटील, किशोर रोनखेडे, अरविंद बावस्कर, वैभव पाटील, जितू कोळी, मुकेश महाजन, प्रवीण नाथ, महेश कोळी, उत्तम काळे, सावकार पारधी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


